मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या बारा संस्थापक पदाधिकार्‍यांची पक्षाला सोडचिट्ठी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या बारा संस्थापक पदाधिकार्‍यांची पक्षाला सोडचिट्ठी

Share This
मुंबई : मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या स्थापनेपासून पक्षाचे खंदे शिलेदार असलेल्या बारा संस्थापक पदाधिकार्‍यांनी पक्षाला सोडचिट्ठी देऊन भाजपात प्रवेश केला असून त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे मनसे चित्रपट कर्मचारी सेनेला खिंडार पडले आहे.  

या पदाधिकार्‍यांमध्ये गोरक्ष धोत्रे, विजय सरोज या उपाध्यक्षांचा, सत्यवान गावडे, नागेश भोईर, अजय घाटे, आनंद म्हस्के या चिटणीसांचा तसेच संतोष बनसोड, संजय रणदिवे, सत्तार चांद शेख, भूषण आंग्रे, इम्रान अन्सारी आणि शशिकांत शिवदासन या उपचिटणीसांचा समावेश आहे. नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजपा मुख्य कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थित, भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत या बारा पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश केला. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या स्थापनेत मोलाचा वाटा असलेल्या या पदाधिकार्‍यांनी पक्षाचा प्रभाव निर्माण करण्यात तसेच चित्रपट क्षेत्रातल्या कलाकार, तंत्रज्ञ यांना पक्षात समविष्ट करून घेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मात्र, सध्या मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे कामकाज ज्या पद्धतीने होत आहे त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे या कार्यपद्धतीत शक्य नाही, कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. तेव्हा अशा पदांवर कार्यरत राहण्याचा आपल्याला अधिकार नाही, या भूमिकेतून मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या पदाधिकारी पदांचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पदाधिकार्‍यांनी १७ ऑगस्टला दिला आणि हजारो कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून अधिक सक्षम आणि चित्रपट क्षेत्राशी सबंधित भरीव काम करण्यासाठी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages