मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर परळ टर्मिनसची घोषणा दोन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी हा प्रकल्प रेल्वेने व्यावहारिक आणि तांत्रिक कामामुळे होणार नसल्याचे म्हणत गुंडाळला होता; परंतु हा प्रकल्प आता रेल्वे प्रशासनाने पुन्हा बाहेर काढला आहे. परळ टर्मिनस होणारच अशी घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून येत्या १५ दिवसांत निविदा खुल्या करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील गर्दी आणि परळ स्थानकातील वाढती प्रवासी संख्या विचारात घेता रेल्वे प्रशासनाने उपनगरीय लोकल गाड्या परळ येथून सोडण्याची योजना आखली होती. त्यासाठी परळ टर्मिनसचा ८0 कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाबाबत २ वर्षे काहीच निर्णय घेण्यात आला नव्हता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना तीन महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात याबाबत विचारले असता अशा कोणत्याही प्रकल्पाचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे उपनगरीय प्रवाशांच्या सोयीचा हा प्रस्ताव रेल्वेने नाकारल्याची भावना प्रवासी संघटनांनी व्यक्त केली होती. सीएसटी ते कुर्ला (५-६वी रेल्वे लाईन) या प्रकल्पाचा भाग म्हणून परळ टर्मिनस बांधण्यात येणार असून त्याचा आराखडा मध्य रेल्वेकडे तयार आहे.
या प्रकल्पासाठी ८0 कोटी रुपयांचा खर्च येणार असून मुख्य पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाच्या खर्चातच याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून येत्या १५ दिवसांत निविदा खुल्या करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महानगर वाहतूक रचना विभागाचे मुख्य अभियंता (बांधकाम) ए. के. अग्रवाल यांनी दिली. यासंबंधीचे काम लवकरच सुरू होणार असून त्यामुळे परळ स्थानकाचा कायापालट होणार आहे. परळ स्थानकातील दक्षिण दिशेचा पादचारी पूल एलफिन्स्टन रोडच्या रस्ते पुलाशी जोडणार. प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाजूला आणखी एक प्लॅटफॉर्म बांधून त्या मार्गावर परेल लोकल येण्याची सोय. त्यामुळे मुंबईहून येणार्या गाड्या एलफिन्स्टन रोडच्या बाजूला टाकण्यात येणार्या नव्या मार्गावरून धावणार. दादरच्या दिशेकडील पादचारी पूल पश्चिम दिशेला उतरविण्यात येणार.
