महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Share This

जीआरपीकडून उपाययोजना करण्यात येणार
मुंबई - महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, त्यावर जीआरपीकडून (गर्व्हमेन्ट रेल्वे पोलीस) अखेर उपाययोजना करण्यात येणार आहेत. महिला आरक्षित डब्यांना पोलिसांची उपस्थिती दर्शविणारे स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची तत्काळ अंमलबजावणीही केली जाणार आहे. यामुळे डब्यात पोलीस कोणत्या वेळेत असतात ही माहिती महिला प्रवाशांना समजण्यास मदत मिळेल. महिला डब्यात पोलीस नसल्यास त्याची माहिती संबंधित नियंत्रण कक्षाला देण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप नंबर आणि हेल्पलाइन नंबरही ठळकपणे देण्यात येणार आहे.

चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमधील महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका युवतीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली. यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. २0१0मध्ये विनयभंगाच्या १५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. २0१४मध्ये याच तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली असून, ५५ तक्रारी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. हे पाहता महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत जीआरपीकडून अभ्यास केला जात होता. त्याचा अहवाल नुकताच पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांना सादर करण्यात आला. यात आरक्षित महिला डब्यांना रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीची माहिती दर्शविणारे स्टिकर्स लावण्याचे सुचविण्यात आले आहे. यात आरक्षित महिला डब्यात पोलीस तैनात असतो की नाही इ. माहिती या स्टिकरवर असणार आहे, असे पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महिला डब्यातही जीआरपीचा व्हॉट्स अ‍ॅप हेल्पलाइन नंबर आणि नियंत्रण कक्षाचा नंबर दर्शविणारे स्टिकर्स लावण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages