मुंबई - दि.28 : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी चित्राताई वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष आ.दिलिप वळसे-पाटील, कोषाध्यक्ष आ.हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रमोद हिंदुराव, प्रवक्ते संजय तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले मुंबई विभागीय महिला अध्यक्षा म्हणून चित्राताई वाघ यांनी चांगली कामगिरी केली आहे. याकाळात त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. पक्षवाढीसाठी व पक्षसंघटना बळकट करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. आज त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून पक्षाकडून त्यांच्यावर महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे.
या नियुक्ती नंतर बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या पक्षाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासा बद्दल मी पक्षाला धन्यवाद देते. कोणताही राजकीय इतिहास नसताना माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटूंबातील महिलेचा पक्षाने ही संधी देऊन सन्मान केला आहे. आगामी काळात राज्यभरातील महिलांचे संघटन करुन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. माझ्या या नियुक्ती बद्दल मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे,विधीमंडळ पक्षनेते आ.अजितदादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, मावळत्या महिला प्रदेशाध्यक्षा आ.विद्याताई चव्हाण यांचे आभार व्यक्त करते
