मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याचे आव्हान प्रशासनासमोर असताना या प्रकरणांतील दोषत्व दरात मोठी घसरण होत चालल्याची माहिती पुढे आली आहे. या मार्गावर २0१२ पासून आतापर्यंत १,११0 चोरट्यांना गजाआड करण्यात आले. मात्र, त्यापैकी केवळ ४१८ आरोपींचे दोषत्व सिद्ध झाले. प्रत्येक वर्षाला आरोपींच्या दोषत्वाचा दर घसरताच असल्याची माहिती मध्य रेल्वेवरील रेल्वे पोलीस बलाच्या (आरपीएफ) मुंबई विभागाने उघड केली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, २0१२ साली ३४१ चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यापैकी १७९(५२ टक्के) आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. या दोषत्व दरात २0१३ साली आणखी घसरण झाली. या वर्षभरात ३७८ चोरट्यांना जेरबंद करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. मात्र, त्यातील केवळ १४१(३७ टक्के) आरोपींना चोरीच्या गुन्ह्याखाली न्यायालयाने दोषी ठरवले. २0१४ सालीही दोषत्व दर सुधारण्याऐवजी पोलिसांची न्यायालयात निराशाच झाली. अटक केलेल्या ३१४ गुन्हेगारांपैकी केवळ ८९(२८ टक्के) आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. चालू वर्षीही दोषत्व दराची तीच निराशाजनक स्थिती आहे. एप्रिल २0१५ पर्यंत १0४ आरोपींना मध्य रेल्वेच्या हद्दीत चोरी करताना अटक करण्यात आली. त्यापैकी केवळ ९(८ टक्के) आरोपी दोषी ठरले आहेत. लोकल रेल्वे आणि मेल गाड्यांची फिटिंग तसेच फॅन्स, हॅण्डल्स, कुशन, वायर, सिग्नलिंग टूल्स, स्टील शिट्स इत्यादी सामानांची चोरी केल्याच्या गुन्ह्यासाठी चोरट्यांना जेरबंद केले जात आहे. लोकल व मेल गाड्या कारशेड उभ्या केल्या असताना अशा चोरीच्या घटना घडत असल्याचे आरपीएफमधील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
