शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांना दिलासा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांना दिलासा

Share This
मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वाटपाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम स्वातंत्र्यदिनापासून सुरू करण्यात आला असून गेल्या पाच दिवसांतच या सर्व जिल्ह्यांच्या १४0 तालुक्यांमधील पात्र शेतकर्‍यांना सुमारे साडेचार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.
औरंगाबाद विभागातील सर्व ८, अमरावती विभागातील सर्व ५ आणि नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण १४ जिल्ह्यांतील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून तसेच आर्थिक अडचणीतील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या दारिद्रय़रेषेवरील शिधापत्रिका (केशरी) शेतकर्‍यांना (एपीएल) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ, तर दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर स्वातंत्र्य दिनी या सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयात संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते या योजनेंतर्गत अन्नधान्य वाटपाच्या योजनेस सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर संबंधित आमदारांच्या हस्ते अन्नधान्य वाटपास प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकरी लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांप्रमाणे प्रतिमाह प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे धान्याचे वाटप करण्यात येत आहे. यामुळे १४ जिल्ह्यांच्या १४0 तालुक्यांमधील पात्र शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षेची हमी मिळाली आहे. शासनाने याबाबत घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित विभागाने व जिल्हा तसेच तालुका स्तरावरील यंत्रणेने अतिशय गतीने ही कार्यवाही सुरू केली आहे. शासनाकडून ५ ऑगस्टला परिपत्रक काढण्यात आल्यानंतर याच दिवशी या योजनेंतर्गत वाटपासाठी केंद्र शासनाकडून ६ हजार ६00 मेट्रिक टन गहू आणि ४ हजार ४00 मेट्रिक टन तांदूळ असे एकूण ११ हजार मेट्रिक टन धान्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर ७ ऑगस्टला राज्यातील संबंधित जिल्ह्यांना या धान्याचे वितरण सुरू झाले. याबाबत त्वरेने कार्यवाही केल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून इकॉनॉमिक कॉस्टने ११ हजार मेट्रिक टन 'अ' दर्जाचा तांदूळ आणि गहू खरेदी करण्यात आला असून त्यापैकी ७ हजार ३३ मेट्रिक टन धान्याची उचल करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांत त्यातील ४ हजार ५३0 मेट्रिक टन अन्नधान्याचे शेतकर्‍यांना वाटपदेखील झाले आहे. उर्वरित धान्यही तातडीने वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. अन्नधान्य वितरणाची ही संपूर्ण प्रक्रिया अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबवण्यात येत आहे, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages