मुंबई / प्रतिनिधी - रस्त्यांवरील खड्डयांबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित सामुग्री महापालिकेच्या वरळी येथील प्रयोगशाळेत तपासण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सदर तपासणी दरम्यान ज्या कंत्राटदारांचे नमुने अपयशी ठरले त्या कंत्राटदारांवर महापालिकेच्या नियम व पध्दतीनुसार कडक कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत संबधित कत्रांटदारांना एकूण ३९ लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
प्रयोगशाळेमध्ये करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान महापालिकेच्या एन, के/पश्चिम, आर/मध्य ह्या विभागांमधील नमुने अपयशी ठरले आहेत. त्यामुळे परिमंडळ ४ (के/पश्चिम विभाग) व परिमंडळ ६ (एन विभाग) मध्ये कार्यरत असणा-या योगेश कन्स्ट्रक्शन व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारास १० लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर परिमंडळ ७ (आर/मध्य विभाग) मध्ये कार्यरत असणा-या कमल एन्टरप्रायजेस व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारास रुपये ५ लाखांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
त्याचबरोबर कोल्डमिक्स बॅगेवर उत्पादकाचा तपशिल नसणे, कोल्डमिक्स बॅग्ज फाटलेल्या असणे किंवा सिलबंद नसणे, कोल्डमिक्स गुणवत्ता तपासणीसाठी संबंधित उत्पादकाचे अभियंता उपलब्ध नसणे आदी त्रुटींसह आर/उत्तर, आर/दक्षिण व जी/दक्षिण या विभागांमध्ये संबंधित साहित्यांचा साठा करण्यासाठी स्वतंत्र गोडाऊन नसणे अशा प्राथमिक त्रुटींसाठी प्रत्येक विभागनिहाय संबधित कत्रांटदारांना प्रत्येकी रुपये १ लाखाचा दंड ठोठाविण्यात आला आहे. यामुळे योगेश कन्स्ट्रक्शन्स व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारांना रुपये १० लाखांच्या दंडाशिवाय आणखी ६ लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर कमल एन्टरप्रायजेस व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर यांना आणखी ३ लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
