"राज्यातला शेतकरी अडचणीत असताना बिहारच्या मदतीबाबत जल्लोष करणाऱ्यांना राज्यातून हद्दपार करा' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"राज्यातला शेतकरी अडचणीत असताना बिहारच्या मदतीबाबत जल्लोष करणाऱ्यांना राज्यातून हद्दपार करा'

Share This

मुंबई:१८ ऑगस्ट
अपुऱ्या पावसाअभावी अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून मदत आणण्याऐवजी बिहारसाठी सव्वा लाखाचे पॅकेज दिले म्हणून जल्लोष करणाऱ्यांना राज्यातूनच हद्दपार केले पाहिजे, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मा. श्री. सचिन अहिर यांनी भाजपवर केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या घोषणेवर खुष होऊन हर्षोल्हासाने भाजप प्रदेश कार्यालयासमोर नाचणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीवर त्यांनी संताप व्यक्त केला.


गेले वर्षभर अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीत होरपळून निघणाऱ्या राज्यातील शेतकऱ्याला यंदा पावसाने पुन्हा हुलकावणी दिली आहे. त्यामुळे खरीप हंगाम तर वाया गेल्यात जमा आहे. त्यातच पीक कर्जाचे थकलेले हप्ते आणि पाणीटंचाईचे संकटही उभे राहिले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकरी पुरता खचून गेला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर अतिशय भीषण परिस्थिती आहे. अशा वेळी शेतकऱ्यांची संपुर्ण भीस्त राज्य सरकारच्या मदतीवर असताना सरकारनेही हात वर केले आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याची भुमिका घेतली. गेल्या वर्षभरात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे मदतीचे अनेक प्रस्ताव पाठवले, पण ना केंद्राने राज्य सरकारच्या मागणीला भीक घातली, ना राज्य सरकारनेही नेटाने प्रयत्न केले.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत सरकारची आश्वासने हवेतच विरली. या सगळ्या पार्श्वभुमीवर बिहारला सव्वा लाखाच्या पॅकेजची घोषणा केल्याबद्दल भाजपने महाराष्ट्रात जल्लोष करणे ही राज्यातल्या शेतकऱ्यांची थट्‌टा तर आहेच,पण हे विकृत मनोवृत्तीचेही लक्षण आहे. त्यामुळे अशा शेतकरीद्वेष्ट्यांना राज्यातून हद्दपार केले पाहिजे, असे मा. सचिन अहिर म्हणाले.

तसेच केंद्र सरकारच्या धोरणावरही त्यांनी यावेळी टीका केली. महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत असतानाही आर्थिक अडचणीचे कारण देत त्यांना मदत करायची नाही आणि बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून सव्वा लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करायची हे केंद्र सरकारचे धोरण म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांशी प्रतारणा असल्याचे सांगत मा. श्री. सचिन अहिर यांनी भाजपच्या धोरणाचा निषेध केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages