मुंबई / प्रतिनिधी - एचवन एनवन (स्वाईन फ्लू), हिवताप (मलेरिया), डेंग्यू व लेप्टोस्पायरोसिस यासारख्या पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी वेळेत औषधोपचार, परिपूर्ण माहिती व सर्वस्तरीय जनजागृती अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे महापालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सरकारी व खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आयोजित एका विशेष कार्यशाळेचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
कार्यशाळेची आवश्यकता व चर्चिले जाणारे विषय याबाबत संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. सुहासिनी नागदा यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर कार्यशाळेच्या सुरुवातीला डॉ. रोझमेरी डिसोझा यांनी पावसाळी आजाराची लक्षणे, निदान व उपचार याबाबत संगणकीय सादरीकरणासह विवेचन केले. त्यानंतर टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बा.य.ल. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी पावसाळी आजारांच्या निदानाबद्दल निर्धारित मानके (स्टॅंडर्ड प्रोटोकॉल) याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या अंतिम सत्रात पावसाळी आजारांबाबत आयोजित चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे, पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. दिलीप कदम, कस्तुरबा रुग्णालयाचे सल्लागार डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. किणीकर, इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉ. होसी कपाडिया, डॉ. प्रीती मेहता यांनी सहभाग नोंदिवला. तर सार्वजनिक आरोग्य विषयक सल्लागार डॉ. अरुण बामणे यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. चर्चासत्राच्या शेवटी आयोजित प्रश्नोत्तर सत्रात उपस्थितांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विविध प्रश्न व शंका मांडल्या. ज्याबाबत मान्यवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन करीत संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली व शंकांचे समाधान केले.
महापलिकेच्या नायर रुग्णालयातील मुख्य सभागृहात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, महाराष्ट्र संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. सुहासिनी नागदा, महापलिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, डॉ. अविनाश सुपे, डॉ. सुलेमान मर्चंट, डॉ. चतुर्वेदी यांच्यासह सरकारी व खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व अभ्यासक उपस्थित होते. कार्यशाळेच्या शेवटी महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी उपस्थित मान्यवरांचे व अभ्यासकांचे आभार मानले.