उच्च न्यायालयाची गणेशोत्सव मंडळाना चपराक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उच्च न्यायालयाची गणेशोत्सव मंडळाना चपराक

Share This
सण-उत्सव रस्त्यांवर साजरे करण्यापेक्षा घरोघरी साजरे करा 
गणपती मंडळे वर्गणीच्या नावावर खंडणी उकळतात 
मुंबई : मुंबईच्या रस्त्या-रस्त्यांवर मंडप उभारून नागरिक आणि रहदारीमध्ये अडथळा निर्माण करत गणेशोत्सव साजरा करणार्‍या गणपती मंडळांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली आहे. सण-उत्सव रस्त्यांवर साजरे करून सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय करण्यापेक्षा हे उत्सव घरोघरी साजरे करा, अशा शब्दांत कानउघडणी करतानाच गणपती मंडळे वर्गणीच्या नावावर खंडणी उकळत असल्याचे परखड मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

'इस्कॉन'ने शिवाजी पार्कवर वार्षिक जगन्नाथ रथयात्रेच्या आयोजनासाठी परवानगी मागत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर सण-उत्सवांदरम्यान ध्वनिक्षेपकाचा होणारा वापर याकडे लक्ष वेधणारी दुसरी याचिका दाखल झाली आहे. या दोन्ही याचिकांवर शुक्रवारी न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी खंडपीठाने गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच अन्य उत्सवांदरम्यान सार्वजनिक रस्त्यांवर उभारल्या जाणार्‍या मंडपांबाबत नाराजीचा सूर आळवला. गणपती मंडळांच्या या मंडपांच्या माध्यमातून वर्गणीच्या नावाखाली केवळ खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. शहरातील खुल्या जागेवर गणेशोत्सव, नवरात्री तसेच अन्य उत्सव साजरे करणे थांबवले पाहिजे.

हे सर्व प्रकार आम्हाला न पटणारे आहेत. या सण-उत्सवांचा फायदा कोण उठवत आहेत? तसेच हे उत्सव ध्वनिक्षेपकांशिवाय साजरे करणे शक्य आहे का? शहरात एकीकडे बिल्डरराज फोफावले आहे. आधीच खुल्या जागांची वानवा असताना उपलब्ध असणार्‍या खुल्या जागांवर सार्वजनिक उत्सव मंडळे आपला मंडप उभारत आहेत. त्यामुळे खुली जागा व मैदानांचा प्रश्न आणखीन बिकट बनला आहे. रस्त्यांवरील सण-उत्सवांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हे उत्सव घरोघरीच साजरे व्हायला पाहिजेत, असे मत व्यक्त करताना खंडपीठाने गणेशोत्सव मंडळांचे चांगलेच कान उपटले. या प्रकरणी दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages