मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीबाग) नूतनीकरणाचे काम सुरू असताना मफतलाल मिलकडून महापालिकेला प्राप्त होणारी जागा ताब्यात घेण्यात आली नसल्याने या भूखंडाबाबत खरेदी सूचना बजावण्यात आली आहे. हा भूखंड पालिका ८० कोटी रुपयांना ताब्यात घेणार आहेत. नवीन भूसंपादन कायदा अस्तित्वात आल्यानंतर खरेदी सूचना बजावल्याने महापालिकेला कोटय़वधी रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
माझगाव विभागातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय यांच्या विस्तार यासाठी आरक्षित असलेला नगरभू क्रमांक ५९१ व १/५९१ हा भूखंड मफतलाल मिल यांच्याकडून प्राप्त होणार आहे. हा भूखंड ताब्यात देण्याबाबत तत्कालिन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी तीन वर्षापूर्वी घोषणा केली होती. परंतु अद्यापही हा भूखंड महापालिकेच्या ताब्यात आलेला नाही. तब्बल ७७२२.४७ चौरस मीटरचा हा भूखंड असून यावर शीतगृह व बहुमजली व्यावसायिक गाळे आणि बेस्टचे विद्युत उपकेंद्र आहे.
मात्र, मफतलाल मिलच्या वतीने महेंद्र राजीव छेडा यांनी महाराष्ट्रातील प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६च्या कलम १२७(१)अन्वये या दोन भूखंडांकरता खरेदी सूचना बजावली आहे. यामध्ये जमिनीचे मूल्य, एकूण बांधकामांचे मूल्य पुनर्वसनाचा खर्च आदी मिळून एकूण ८०.०९ कोटींचा खर्च येणार आहे. या भूखंडावर ७५ गाळेधारक आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी सध्याच्या रेडीरेकनरनुसार २८.८९ कोटींचा खर्च येणार असून उर्वरित रक्कम ही जमिनीचे मूल्य आहे. ही खरेदी सूचना २४ फेब्रुवारी २०१६ पर्यंत मंजूर न केल्यास हे आरक्षण रद्द होईल आणि या भूखंडाचा विकास करण्यास जमीन मालकाचा मार्ग मोकळा होईल.
