पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' देऊन सरकारने राज्याची अस्मिता लाथाडली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' देऊन सरकारने राज्याची अस्मिता लाथाडली

Share This
मुंबई : जेम्स लेन यांनी लिहिलेल्या आणि बंदी असलेल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीची आणि खोटी माहिती पुरवली होती. एवढेच नाही तर त्या वादग्रस्त पुस्तकाचे वितरकही पुरंदरेच आहेत. असे असताना राज्यातीलच नव्हे तर देशातील बहुजन समाजाच्या अस्मितेला लाथाडून सरकारने पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण ठरवून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते राणे यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत केली.
आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा जर वानखेडे स्टेडियमवर घेता, घाबरत नाही म्हणता तर ज्यांनी शिवाजी महाराज घराघरात पोहोचवला त्यांचा महाराष्ट्र भूषण, हा राज्याचा सर्वोच पुरस्कार राज भवनात, दरबार हॉलमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत का घेतला, असा सवाल राणे यांनी केला. पुरंदरे यांचे आता राज्यभर सत्कार होतील असे मुख्यमंत्री म्हणतात. हे सत्कार झालेच तर त्यांना ते पिंजर्‍यातच घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे शिवाजी महाराज की, महाराजांमुळे पुरंदरे ओळखले गेले असा सवाल करीत राणे म्हणाले की, पुरंदरे कोणते इतिहासकार? त्यांनी काय संशोधन केले? जेम्स लेनला कोणी माहिती दिली? सोलापूरमधील आपल्या व्याख्यानानंतर जेम्स लेनचे पुस्तक घ्या असा प्रचार पुरंदरेंनीच का केला? मग आता त्या पुस्तकावरील बंदी हे सरकार उठवणार आहे का? असे सवाल केले. भांडारकर प्राच विद्या इतिहास संशोधन संस्थेवर हल्ला करणारे त्या वेळी शिवसैनिकच होते. मग आता शिवसेना गप्प का, असा सवालही त्यांनी केला. सरकारने कोणतीही बाब न तपासता हा कार्यक्रम रेटून नेला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, हा कसला मराठा, हा तर बोगस मराठा आहे. मराठवाड्यावर दुष्काळाचे तीव्र सावट आहे. आधीच नापिकी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना सरकारने कोणतीही मदत दिली नाही. प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. दुबार पेरणीसाठी सरकारने खते बी-बियाणे दिलेले नाहीत. दोन-दोन महिने पालकमंत्री फिरकलेच नाहीत. युती सरकारच्या या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांमध्ये कमालीचा असंतोष खदखदतो आहे. या असंतोषाला जातीय वाद-विवादात गुंतवण्यासाठी सरकारने वादग्रस्त व्यक्तीचे नाव महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी घोषित करून जनतेत जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौर्‍यांवरही राणे यांनी टीकास्त्र सोडले. त्यांच्या घोषणा म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण. महागाई दुपटीने वाढली. आता बिहारसाठी पॅकेजची घोषणा केली. पण त्यातील एक रुपयाही बिहारमध्ये पोहोचणार नाही, असेही ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages