मुंबई / अजेयकुमार जाधव
बेस्टच्या बस स्थानकावर अनधिकृत गाड्या उभ्या केल्या जातात. अश्या गाड्यांवर कोणतीही कारवाई सुद्धा होत नाही. रस्त्यावर बसेस धावताना अनेक वेळा रहदारीत अडकलेल्या असतात. अश्यावेळी बससाठी वेगळी लाईन असावी आणि बस थांब्यांवर इतर खाजगी गाड्या उभ्या राहू नयेत म्हणून येत्या ४ ऑगस्ट पासून ७ ऑगस्ट पर्यंत जनजागृती अभियान राबविले जाणार असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी पत्रकारांना दिली.
मुंबई मध्ये वाढत्या वाहनामुळे पार्किंगची समस्या झाली आहे. मुंबई मध्ये कोठेही गाड्या उभय केल्या जातात तश्याच त्या बेस्टच्या बस थांब्यावरही उभ्या केल्या जातात. यामुळे बस थांब्यांवर बस बसेसना उभ्या करण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने रस्त्याच्या मधोमध बस उभ्या केल्या जात असल्याने त्याचा त्रास प्रवाश्यांना होतो. रस्त्यावर एका बाजूला खाजगी वाहने उभी केल्यानेही रस्त्यावरील एक लेन पार्किंगने भरली असते यामुळे उरलेल्या रस्त्यावर वाहने चालवावी लागतात. यावर मार्ग काढण्यासाठी बससाठी वेगळे मार्ग असावेत अशी आमची मागणी आहे. त्याप्रमाणे कुर्ल्याच्या बीकेसीमध्ये तशी मंजुरी मिळाली आहे. परंतु इतर ठिकाणी हि संकल्पना राबण्याबाबत अद्याप चर्चा सुरु आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी बेस्टने जनजागृती अभियान सुरु करण्याचे ठरवले आहे असे पाटील यांनी सांगितले.
४ ते ७ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या अभीयानात बेस्ट, एनएसएसचे ३५० विद्यार्थी आणि इंडियन ऑईल सहभागी होणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य करून लोकांमध्ये एनएसएसचे विद्यार्थी जनजागृती करणार आहेत. यावेळी लोकांनी आपल्या खाजगी गाड्या बस थांब्यांवर लावू नका, रस्त्यावर कुठेही चुकीच्या ठिकाणी आपल्या गाड्या पार्क करू नका असे आवाहन करण्यात येणार आहे. रस्त्यावर कश्याही प्रकारे गाड्या उभ्या केल्या जात असल्याने आरटीओशी संपर्क साधण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या या सुद्धा वाहतुकीमध्ये अडथळे आणत असल्याने आरटीओला बेस्टच्या वृक्ष छाटणीच्या गाड्या देवून रहदारीमध्ये येणाऱ्या फांद्या छाटण्यात येतील. असे केल्याने बसच्या रहदारीत येणारे अडथळे कमी करून चांगली आणि जलद बस सेवा देणे शक्य होईल असे पाटील यांनी सांगितले.

