डांबरीकरणानंतर महिनाभरातच रस्त्याची 'वाट' - कंत्राटदाराला अडीच लाखांचा दंड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डांबरीकरणानंतर महिनाभरातच रस्त्याची 'वाट' - कंत्राटदाराला अडीच लाखांचा दंड

Share This
मुंबई : भांडुप (पश्‍चिम) टेंबीपाड्यातील सन्मानसिंग रोड रस्त्याचे पावसाळ्याआधी डांबरीकरण केल्यानंतर एक महिन्याच्या आतच त्याची 'वाट' लागल्याचे निदर्शनास आले आहे. या रस्त्याचे काम करणार्‍या 'महावीर कंस्ट्रक्शन' या कंत्राटदाराकडून पालिकेने अडीच लाख रुपयांचा दंड आकारला आहे. यामुळे या कंत्राटदाराने सुमार दर्जाचे डांबरीकरण केले होते, हे स्पष्ट झाले आहे. 

टेंबीपाडा रोड व सन्मानसिंग रोड येथील रस्ते सहा महिन्यांपूर्वीच दुरुस्त केले होते. पण एक महिना होत नाही तोपर्यंत त्यावरील डांबर पावसाळ्यात वाहून गेले. त्यामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. भांडुप पश्‍चिम येथे १0 ते १२ रस्त्यांचे काम कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले आहे. सुमार काम करणार्‍या कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही. रस्ता बनवताना जेथे पर्जन्य जलवाहिन्या आहेत, त्यांचे चेंबरदेखील अर्धवट अवस्थेत केले आहे. यामुळे हे काम करणार्‍या 'महावीर कंस्ट्रक्शन' या कामचुकार कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या स्थानिक नगरसेविका अनिषा माजगावकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे केली होती. 'सन्मानसिंग रोडवरील खड्डा हा पाण्याच्या गळतीमुळे झालेला होता. तो दुरुस्त करण्यात आला. टेंबीपाडा रोडवरील रुंदीकरणामुळे काही भागाचे डांबरीकरण पावसाळ्याच्या सुरुवातीला करण्यात आले. पण उतारावरून वेगाने येणार्‍या पाण्यामुळे डांबराच्या पृष्ठभागाची त्वरित झीज झाली. नंतर या भागात कंत्राटदाराकडून तातडीने डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र 'महावीर कंन्स्ट्रक्शन'ला अडीच लाख रुपयांचा दंड आकारला आहे, अशी माहिती पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या प्रमुख अभियंत्यांनी दिली. असे असले तरी या रस्त्याचा पृष्ठभाग पावसाळ्यानंतर पुन्हा नव्याने करण्यात येईल. सन्मानसिंग रोडवरील पर्जन्य जलवाहिनीच्या चेंबरचे काम पूर्ण झाले आहे. हे रस्ते कंत्राटदाराच्या दोष दायित्व कालावधीत (डिफेक्ट लायबलिटी पिरीयड) राहणार असल्याने कोणताही दोष उद्भवल्यास त्याची दुरुस्ती 'महावीर कंस्ट्रक्शन'कडून करून घेण्यात येईल, असे प्रमुख अभियंत्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages