श्रेय घेण्याची भाजप- शिवसेनेची चढाओढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

श्रेय घेण्याची भाजप- शिवसेनेची चढाओढ

Share This
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) - :  संकल्पना एक मात्र भूमिका वेगवेगळ्या मांडत श्रेय वाटून घेण्याचा प्रयत्न पालिकेतील शिवसेना-भाजपमध्ये सुरू झाला आहे. शिवसेनेच्या नाईट लाईफ विरोधी भाजपचा नाईट बाजार आता पालिकेच्या शाळांतील मुलांना टॅबव्दारे धडे देण्याच्या शिवसेनेच्या संकल्पनेनंतर आता भाजपचे डिजीटल एज्युकेशन अशा संकल्पना मांडून श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे. जसजशी पालिका निवडणूक जवळ येईल तसे सत्ताधाऱ्यांमधील श्रेयाची खेचाखेच वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


एलईडीवरून सत्ताधारी शिवसेना -भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नाईट लाईफ व गच्चीवरील पार्टीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने विरोध केल्यानंतर पालिकेच्या सुधार व विधी समितीतही हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यावेळी भाजपनेही पाठिंबा दिला नाही. सत्ता असतानाही युवा नेत्याचे स्वप्न शिवसेनेला पूर्ण करता आलेले नाही. यामध्ये भाजपने मात्र सावध पवित्रा टाकून नाईट लाईफ सारखाच नाईट बाजार प्रस्ताव आणून विधी समितीत मंजूरही करून घेतला. नाईट लाईफ चालत नाही मग नाईट बाजार कसा चालतो असा सवाल करीत नाईट बाजारचा प्रस्ताव पालिका महासभेत अडवू असा पवित्रा शिवसेना घेणार असल्याचे त्यातील काही नगरसेवकांनी बोलूनही दाखवले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डिजीटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्याच्यादृष्टीने पालिकेतील भाजपचा प्रयत्न सुरु झाला आहे. शिवसेनेने पालिका शाळांतील मुलांना टॅबवर धडे देण्यासाठी टॅबचा प्रस्ताव आणला. त्यानंतर लगेचच भाजपने डिजीटल एज्युकेशनचा प्रस्ताव आणून एकाच संकल्पनेतील श्रेयाची वाटणी करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीतल्या जाहिरनाम्यातील टॅबचा मुद्दा येत्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने उशिरा का होईना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपनेही तशाप्रकारचाच प्रस्ताव आणून जवळपास एकच संकल्पना असलेल्या मुद्द्यावर श्रेय वाटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सेना -भाजपमधील या कुरघोडी वाढत जातील, त्यात सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र तसेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages