मास्टर लिस्टबाबत म्हाडाकडून पुढील कारवाईसाठी दिरंगाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मास्टर लिस्टबाबत म्हाडाकडून पुढील कारवाईसाठी दिरंगाई

Share This
मुंबई : गेली अनेक वर्षे आपल्या हक्काच्या घरापासून वंचित असलेल्या संक्रमण शिबिरात राहणार्‍या रहिवाशांना मास्टर लिस्टच्या माध्यमातून आशेचा किरण दिसेल, अशी आशा होती. मात्र, गेले वर्षभर ३२३ जणांची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतरही म्हाडाकडून पुढील कारवाईसाठी दिरंगाई होत असल्याचे दिसून आले आहे. 
धोकादायक इमारतीत तसेच कोसळलेल्या इमारतींतून संक्रमण शिबिरात राहण्यास गेलेली हजारो कुटुंबे १५ ते २0 वर्षांहूनही अधिक काळ हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. या संक्रमण शिबिरात आयुष्य काढणार्‍या मूळ रहिवाशांना हक्काच्या घरांसाठी अनेक वर्षे प्रतीक्षा आहे. त्यामुळेच या रहिवाशांच्या सुनावणीनंतर पात्रता निश्‍चिती प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानंतर ३२३ जणांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली. मात्र, त्यावरच ८00 जणांनी हरकती नोंदवण्यात आल्या. याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येऊन ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मास्टर लिस्टची यादी ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही म्हाडा अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट महिना संपत आला तरीही म्हाडाकडून कोणतीही प्रक्रिया पुढे सरकवण्यात आलेली नाही. त्यामुळे अजूनही मास्टर लिस्टचे घोंगडे भिजत असल्याचे दिसून आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages