मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाने सर्वप्रथम व फार आधी केली आहे. त्यामुळे या स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला पक्षाचा विरोध आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला आंबेडकरांचेच नाव दिले जावे अन्य कोणाचेही नाव दिल्यास पक्षातर्फे रस्त्यावर उतरुन तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. वडाळा येथे नाना शंकरशेठ यांच्या स्मारकाचे काम सुरु करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांचे नाव वडाळा स्थानकाला दिले जावू शकते असे ते म्हणाले.
गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या लढ्याला आठवलेंनी पाठिंबा जाहीर केला. पटेल समाजाला आरक्षण देणे आवश्यक आहे, मात्र त्यांना आरक्षण देताना इतर मागास प्रवर्गात समाविष्ट न करता त्यांच्यासाठी विशेष प्रवर्ग तयार करुन त्यांना आरक्षण दिले जावे असे ते म्हणाले. पटेल समाजाच्या आरक्षणाचा लढा पाहून नारायण राणे व नीतेश राणे हे पिता पुत्र मराठा समाजासाठी लढा देण्याचा अविर्भाव करत आहेत, मात्र राणे पिता पुत्र हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करत असल्याचा आरोप आठवलेंनी केला. आरक्षणाच्या लढाईसाठी मराठा समाज एकत्र येण्याची शक्यता नाही, तो समाज राजकारणासाठी एकत्र येतो. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारण्याचे दावे करणाऱ्यांनी गुजरातमधील पटेल समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत असलेल्या हार्दिक पटेल यांच्याकडून व समाजाच्या एकीकडून काहीतरी शिकावे, असा टोला त्यांनी लगावला. हार्दिक पटेलला जितका पाठिंबा पटेल समाजातून मिळत आहे, तितका प्रतिसाद व पाठिंबा राणेंना मराठा समाजाकडून मिळण्याची शक्यता नाही, असे आठवले म्हणाले. कॉंग्रेस सरकारने निवडणूका समोर ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे नाटक केले, मात्र आरक्षण देण्याचा त्यांचा विचार नव्हता असा आरोप त्यांनी केला.
ब् राह्मण समाजात ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्यांना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी आठवले यांनी दिली.
