जेलमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जेलमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा

Share This

मुंबई : दक्षिण मुंबईतील आर्थर रोड कारागृहाच्या आवारात कैद्यांना भेटण्यासाठी येणार्‍या नातेवाईकांच्या गर्दीचे चित्र आता दूर होणार आहे. ग्रामीण भागातील नातेवाईकांना करावा लागणारा मोठा प्रवास तसेच कारागृहाबाहेरील काही तासांची प्रतीक्षा ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने मध्यवर्ती कारागृहांत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा कार्यान्वित केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून प्रत्येक कैद्याला महिन्यातून दोन वेळा दहा मिनिटे नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे.
मध्यवर्ती कारागृहांत राज्याच्या विविध भागांतील आरोपींना कैद केले जाते. अनेक प्रकरणांत कैद्याचे आई-वडील वयोमानामुळे त्यांना भेटण्यासाठी लांबचा प्रवास करू शकत नाही. नव्या योजनेनुसार, ते नातेवाईक आता जवळच्या कोणत्याही जिल्हा न्यायालयात जाऊन नोंदणी करू शकतात. तेथूनच त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नातलग कैद्याशी संवाद साधता येणार आहे. संबंधित न्यायालयाकडून दुजोरा मिळाल्यानंतर कैद्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रूममध्ये नेले जाईल व तेथून १0 मिनिटे नातेवाईकांशी बोलण्यास मुभा दिली जाणार आहे. 

राज्य सरकारने सुरुवातीला आर्थर रोडसह ठाणे सेंट्रल आणि तळोजा या कारागृहांत ही सुविधा सुरू केली आहे. कैद्यांना भेटण्यासाठी येणार्‍या नातेवाईकांची प्रत्येक कारागृहाच्या आवारात मोठी गर्दी होते. एकट्या आर्थर रोड कारागृहाचा विचार करता, या ठिकाणी दरदिवशी जवळपास ५00 लोक आपल्या नातलग कैद्याला भेटण्यासाठी हजेरी लावतात. हे कारागृह देशातील सर्वाधिक संवेदनशील कारागृहांपैकी एक आहे. ८0४ आरोपींना कैद करण्याची क्षमता असलेल्या या कारागृहात सद्यस्थितीत २८00 आरोपी बंदिस्त आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा कैद्यांच्या नातेवाईकांसाठी वेळ आणि खर्चाच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरणार आहे. तसेच कारागृह सुरक्षेच्या दृष्टीनेही हे एक स्वागतार्ह पाऊल मानले जात आहे. कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांची मोठी गर्दी होते. त्या गर्दीवर पोलिसांना बारीक लक्ष ठेवावे लागते. 'मीटिंग रूम'च्या ठिकाणी तैनात केले जाणारे पोलीस कर्मचारी आता नव्या सुविधेमुळे अन्य कामासाठी उपलब्ध होतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages