शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर

Share This

मुंबई, दि. 31 : मराठवाड्यातील टंचाईसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून (दि. 1 सप्टेंबर) तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असून त्यात पाच जिल्ह्यांतील पीक परिस्थिती, चारा छावण्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना भेटी देण्यासह शासकीय यंत्रणेकडून सुरू असलेल्या मदतीच्या उपाययोजनांची ते माहिती घेणार आहेत.


मराठवाड्यातील काही भागात अपुऱ्या पावसामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत शासनातर्फे करण्यात येत असलेल्या मदतीच्या उपाययोजनांना गती देण्यासह शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्यमंत्री मंगळवारी (1 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तातडीने मराठवाड्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी लातूर जिल्ह्याची आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ, निलंगा आणि औसा तालुक्यातील गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी करतील व चारा छावणी-वनीकरण क्षेत्रास भेट देतील. त्यानंतर रात्री उस्मानाबाद येथे जिल्हा आढावा बैठक घेणार आहेत.

बुधवारी  (2 सप्टेंबर)   मुख्यमंत्री उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या तालुक्यांतील पीक परिस्थितीची पाहणी करण्यासह चारा छावणी, वैरण विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांचीही पाहणी करतील. तसेच या तालुक्यांतील काही जलप्रकल्पांनाही ते भेटी देणार आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात टंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासह रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या फळबागा लागवडीच्या कामांनाही ते भेट देणार आहेत. 

सायंकाळी उशिरा बीड येथे जिल्हा आढावा बैठकीत शासकीय पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री माहिती घेतील.
मुख्यमंत्री गुरुवारी (3 सप्टेंबर) परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, गंगाखेड, पालम आणि परभणी तालुक्यांतील पीक परिस्थिती, जलयुक्त शिवार योजनेची कामे, चारा छावण्या आदींची पाहणी करतील. दुपारी परभणी येथे जिल्हा आढावा बैठक होईल. सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गावांना भेट देऊन टंचाई निवारणार्थ सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची मुख्यमंत्री माहिती घेतील.

मराठवाड्याच्या या दौऱ्यात टंचाईचे सावट भेडसावत असलेल्या विविध गावांतील सर्वसामान्य शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार असून शासकीय यंत्रणेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा त्यांना अधिकाधिक लाभ होण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आदेशित करतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages