पाण्यासाठी पालिकेच्या जी/उत्तर जल विभाग कार्यालयावर हंडामोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाण्यासाठी पालिकेच्या जी/उत्तर जल विभाग कार्यालयावर हंडामोर्चा

Share This
मुंबई : नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी वेळेवर मिळावे, या मागणीकरिता नागरिक सुविधा सेवा समिती आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्या वतीने मंगळवारी धोबीघाट येथून सर्व नागरिकांचा व महिलांचा प्रचंड हंडामोर्चा दादर जी/उत्तर जल विभाग कार्यालयावर नेण्यात आला. या वेळी नागरिक सुविधा सेवा समितीच्या वतीने मनपा सहायक आयुक्त शरद उघडे यांना निवेदन देण्यात आले. त्यात प्रभाग क्र. १७६ विभागात स्वच्छ आणि पुरेसा पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
धारावीतील प्रभाग क्र. १७६ मध्ये मागील काही आठवड्यापासून बहुतेक भागात अपुरा आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या संदर्भात मनपा जी/उत्तर जल विभागात अनेक तक्रारी आणि विनंत्या करण्यात आल्या होत्या. परंतु या तक्रारीवर मनपा जल विभागाकडून आश्‍वासन देण्यापलीकडे कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. यामुळे विभागातील रहिवाशांमध्ये मनपा जल विभागाविरोधात प्रचंड नाराजी होती. यासंदर्भात मनपा जी/उत्तर सहायक आयुक्त शरद उघडे यांना विचारले असता त्यांनी जल विभागातील संबंधित अभियंत्यांना विभागात होत असलेल्या अपुरा आणि दूषित पाणीपुरवठय़ासंदर्भात माहिती घेऊन त्वरित कारवाई करण्याच्या सूचना केली असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. १७६ मध्ये एम. जी. रोडवर १२ इंची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून विभागातील नागरिकांनी आपल्या नळ जोडण्या स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन जुन्या जलवाहिनीतून काढून नवीन १२ इंची नवीन जलवाहिनीत मनपाच्या सहकार्याने अधिकृतरीत्या जोडून घ्याव्यात, असे आवाहन केले आहे. जल विभागावर नेण्यात आलेल्या हंडामोर्चात आयोजक सिद्धार्थ मेढे यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages