मुंबई - मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गांवर रविवारी (ता. 6) मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 या वेळेत कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या (अप) जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. त्यामुळे "अप‘ जलद मार्गावरील रेल्वेगाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकात समाप्त होईल, तर दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून सुटेल. "अप‘ मार्गावरील सर्व मेल-एक्स्प्रेस कल्याण स्थानकानंतर धीम्या मार्गावरून धावतील.
हार्बर लाईनवर सकाळी 10.40 ते दुपारी 3.45 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल. परिणामी सीएसटी ते अंधेरी-वांद्रे स्थानकांदरम्यानची लोकल वाहतूक या वेळेत बंद राहील. सीएसटी ते वाशी-बेलापूर-पनवेल लोकल सेवा सकाळी 11 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत आणि वाशी-बेलापूर-पनवेल ते सीएसटी लोकल सेवा सकाळी 10 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत बंद राहील. पनवेल ते कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्यांच्याकडील तिकिटावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेनलाईन आणि पश्चिम रेल्वेचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या वेळेत सर्व रेल्वेगाड्या जलद मार्गावरून धावतील.
