शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त

Share This
मुंबई : मुंबई विभागातील शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या शिक्षण उपसंचालक या पदासह पश्‍चिम विभागाचे शिक्षण निरीक्षकपद, उत्तर विभागातील शिक्षण उपनिरीक्षक पद यासह अनेक पदे रिक्त आहेत. याचा शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे ही पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी शिक्षक परिषदेच्या मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाच्या अंतर्गत मुंबईतील उत्तर, पश्‍चिम व दक्षिण विभाग, शिक्षण निरीक्षक कार्यालय तसेच ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये सर्वाधिक पदे उत्तर विभागात रिक्त आहेत. उत्तर विभागातील मंजूर ५९ पदांपैकी २२ पदे रिक्त आहेत. यामध्ये शिक्षण उपनिरीक्षक दर्जाची ४ पदे, सहाय्यक शिक्षण निरीक्षक दर्जाचे १, वरिष्ठ लिपिकाची ५, कनिष्ठ लिपिकाची ६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उत्तर विभागातील कर्मचार्‍यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. नियमित कामांसोबतच शिक्षण निरीक्षक कार्यालयांना सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातील उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या अनेक योजनांचे कामदेखील पाहावे लागते. मुंबईतील मोठय़ा प्रमाणावर असलेली शाळांची संख्या तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची प्रशासकीय कामे विचारात घेता शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असल्याचे शिक्षक परिषदेच्या मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. याबाबत त्यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण सचिव नंदकुमार व शिक्षण आयुक्तांना निवेदन देऊन या मागणीकडे लक्ष वेधले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages