मुंबई 1 Sep. 2015 ( प्रतिनिधी ) -, गणेशोत्सवात कचऱ्याचे प्रमाण वाढते. हा कचरा उचलण्याचा नेहमी प्रश्न निर्माण झालेला असतो. गणेशोत्सवात निर्माण होणारा कचरा उचलून मुंबई स्वच्छ ठेवावी म्हणून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी फक्त रस्तेच नव्हे तर झोपडपट्टयांच्या स्वच्छतेवरही भर द्या, असे निर्देश मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात कचऱ्याचे प्रमाण वाढते. पालिकेकडून सार्वजनिक मंडळांचे निर्माल्य व कचरा गोळा करण्यात येतो. मुंबईत तब्बल एक लाखाच्या आसपास घरगुती गणपती आहे. या प्रत्येक घरांतील कचरा गोळा करण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना मंगळवारी आयुक्त मेहता यांनी अधिकाऱ्यांना केली. गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याची ताकिदच त्यांनी दिली. फक्त लहान -मोठे रस्तेच नव्हेत तर गल्लीबोळातील कचरा साफ करण्याची सूचना आयुक्तांनी विभाग प्रमुखांच्या आढाव बैठकीत केली. गणेशोत्सवाच्या काळात झोपड्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो.अनेक झोपडपट्टयांच्या परिसरात पालिकेची यंत्रणा पोहोचू शकत नाही.अशा ठिकाणी कचऱ्याचे ढिग जमा होतात. असे ढिग जमा होऊ देऊ नका, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
