वेळ पडल्यास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वेळ पडल्यास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढणार - मुख्यमंत्री

Share This

मुंबई, दि. 1 : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, वेळप्रसंगी कर्ज काढण्याचीही राज्य शासनाची तयारी आहे, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील टंचाई भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.


मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्याची सुरूवात मुख्यमंत्र्यांनी आज लातूर येथून केली. आष्टा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी निवेदने स्वीकारुन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पीक-पाण्याची परिस्थिती चिंताजनक असल्याची शासनास जाणीव आहे. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने आजच 86 कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. चाऱ्याची टंचाई भासणार नाही याची काळजी घेण्यात येईल. या सर्व उपाययोजना करताना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढावे लागले तरी राज्य सरकार मागेपुढे पाहणार नाही.
            
या पाहणीदरम्यान त्यांनी एका स्वस्त धान्य दुकानाला भेट दिली. तेथे त्यांनी शेतकऱ्यांना दोन रूपये किलो दराने गहू आणि तीन रूपये दराने तांदूळ वाटप केले. शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यास राज्य सरकारने 15 ऑगस्ट रोजी प्रारंभ केला होता. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांना त्यांनी भेटी दिल्या. दौऱ्यादरम्यान मध्य प्रदेशातील शेततळ्यांसाठी वापरण्यात आलेल्या देवास पॅटर्नची राज्यात अंमलबजावणी करण्याची सूचना एका शेतकऱ्याकडून प्राप्त होताच मुख्यमंत्र्यांनी त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.
            
निलंगा तालुक्यातील निटूर आणि गौर येथील पीक परिस्थितीचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर तुपडी येथील चारा छावणीला भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, ज्या शेतकऱ्यांची मुले बाहेरगावी शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शिक्षणाचे शुल्क शासनाकडून भरण्यात येईल. तसेच जनावरांना मुबलक चारा आणि पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. या दौऱ्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी सहभागी झाले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages