नालेसफाईतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई कराच ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई कराच !

Share This
मुंबई महानगरपालिकेने आणि कंत्राटदारांनी नालेसफाई योग्य रित्या केली नसल्याने १९ जूनच्या पावसात मुंबई तुंबली होती. मुंबई तुंबली असताना सत्ताधारी शिवसेना मात्र नालेसफाई झाल्याचा दावा करत होती. तर सत्तेत सहभागी असलेलील्या भाजपाने नालेसफाईबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करत केले होते. विरोधी पक्षांनी तर नालेसफाई झालीच 18 जूनला कोंग्रेसचे नगरसेवक मोहसिन हैदर यांनी पत्रकार परिषद् घेवुन नालेसफाई बोगस असल्याचे उघड केले. नालेसफाईचा गाळ मुंबईमधे टाकण्यास जागा उपलब्ध नसल्याने कंत्राटदारानी गाळ टाकण्यासाठी मुंबई बाहेर जागा बघावी अशी अट घालण्यात आली होती. या अटीची पुर्तता करताना अनेक कंत्राटदारानी खोट्या सह्या शिक्का लेटरहेड असणारी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे हैदर यांनी पुरावे पत्रकाराना दिले होते. आणि दुसऱ्याच दिवशी संपूर्ण मुंबई पाण्याने तुंबली होती

या सर्व प्रकारणाची दखल घेत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मुंबई मध्ये नालेसफाईत कसा भ्रष्टाचार केला जातो याबाबतचा "नालेसफाईत हातसफाई" हा सविस्तर लेख दैनिक जनतेचा महानायक मध्ये २२ जून २०१५ ला प्रसिद्ध झाला होता. या लेखा मध्ये आम्ही मांडलेले मुद्दे अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. आम्ही मांडलेले मुद्दे पालिकेच्या अहवालातून समोर आले आहेत. नालेसफाईचा अहवाल नुकताच स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना सादर करण्यात आला आहे. हा अहवाल आयुक्तांनी बुधवारी स्थायी समिती समोर अध्यक्षांकडे सदर केल्याने येत्या ९ सप्टेंबरला या अहवालावर सविस्तर चर्चा होणार आहे. या अहवालात कंत्राटदारांनी केलेल्या नालेसफाईबाबत प्रश्न चिन्ह उभे करण्यात आले आहेत. यामुळे विरोधक आणि सत्तेत सहभागी असलेली भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना येत्या स्थायी समिती बैठकीमध्ये पाहायला मिळणार आहे. 

आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांचे साटेलोटे बाहेर आले आहे. मुंबईमधील नाले सफाई करण्यासाठी नेमलेल्या ५४ कंत्राटदारांपैकी ९ कंत्राटदारांच्या कामांची एक स्याम्पल म्हणून चौकशी करण्यात आली यामध्ये हे ९ पैकी ९ म्हणजेच १०० टक्के कंत्राटदार दोषी आढळले आहेत. अहवालात एकच वाहन अनेक कंत्राटदारांचा गाळ टाकण्यासाठी एकाच वेळी वापरात आल्याचे म्हटले आहे. मोहसीन हैदर यांनी गाळ टाकण्यासाठी ज्या जाग कंत्राटदारांनी दाखवल्या त्याचे खोटे कागदपत्र दिल्याचे म्हटले होते. याबाबतही चौकशी करण्यासाठी समिती गेली असता समितीला जमीन मालकांनी सहकार्य केलेले नाही. गाळ ज्या ठिकाणी टाकला त्या जमीन मालकानी चौकशी समितीला सहकार्य केलेले नाही असे अहवालात म्हटले आहे. 

शिवसेनेचे सध्या खासदार असलेले आणि याआधी स्थायी समिती अध्यक्ष असलेले राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेवून पालिकेची वाहने कुठे असतात याची माहिती एका क्लिकवर मिळावी म्हणून आपल्या कार्यकाळात पालिकेच्या वाहनामध्ये जीपीएस ट्रयाकिंग सिस्टम सुरु करून घेतली होती. हीच जीपीएस ट्रयाकिंग सिस्टम नालेसफाईचा गाळ नेणाऱ्या गाड्यामध्ये होती. परंतू हि सिस्टम कामच करत नसल्याचे चौकशी समितीच्या अहवालात उघड झाले आहे. सिस्टम काम करत नसल्याने यामुळे कोणत्या आणि किती गाड्या गाळ ने आण करत होत्या त्या नेमक्या कोणत्या ठिकाणी जात होत्या याची नेमकी माहिती पालिकेला मिळालेली नाही. नालेसफाईबाबत थर्ड पार्टी ऑडीट करण्याचे बंधन असताना असे ऑडीट करण्यात आलेले नाही. 

या आधीही हि सिस्टम गाळ नेणाऱ्या वाहनातून काढून मोटर सायकल वर लावली जात होती. गाळ काढण्याच्या ठिकाणा पासून गाळ टाकण्याच्या ठिकाणा पर्यंत मोटार सायकल फिरवून गाळ टाकणाऱ्या गाड्या फिरत असल्याचे भासवले जात होते. आता तर पूर्ण हि यंत्रणाच निकामी ठरली आहे. यामुळे जीपीएस सिस्टम देणाऱ्या कंपनीचेही यात साटेलोटे उघड झाले आहे. अशी काम चुकार यंत्रणा आणल्याने आणि सातत्याने नालेसफाईबाबत समाधान व्यक्त करून इतरांचे न ऐकल्याने शिवसेना या सत्ताधारी पक्षावर चांगलीच टिका होणार आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेवर टिका होणार हे माहित झाल्याने आता तशी तयारी सुरु केली गेली आहे. 

या तयारीचा एक भाग म्हणून नालेसफाईचा अहवाल स्थायी समिती अध्यक्षांकडे सादर करताच भाजपाने दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे आधी शिवसेनेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी एक तास आगोदर पत्रकार परिषद घेवून नालेसफाईमध्ये दोषी आढळलेल्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची, जीपीएस यंत्रणा पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची, नालेसफाईच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अशीच मागणी भाजपच्या गटनेते असलेल्या मनोज कोटक यांनीही केली आहे. ९ कंत्राटदाराबरोबर  इतर कंत्राटदारांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. नालेसफाईबाबत जे आधी पासून सांगत होतो तेच समोर आले असल्याचे सांगून भाजपा शिवसेने पेक्षा किती स्वच्छ आणि पुढे आहे हे कोटक यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशोधर फणसे यांनी नालेसफाईमध्ये इतका भ्रष्टाचार सुरु असताना आपल्याला किंवा पक्षाला याबाबात काहीही माहित नसल्याचे सांगितले आहे. आम्ही किंवा आमचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा नालेसफाईचा दौरा करतात तेव्हा नालेसफाई होत असल्याचे दिसते. परंतू एकच गाडी इतर कंत्राटदार वापरतात, गाळ उचलताना दिसतो पण तो नेवून कुठे टाकला जातो याची आम्हाला माहिती नसल्याचे म्हटले आहे. यावरून सत्ताधारी पक्षाला आपली सत्ता असताना आपल्या प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार मिळून कशी कामे करत आहेत याचा अंदाजच नसल्याचे उघड होत आहे. सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची प्रशासनावर जी पकड असायला हवी ती पकड आता राहिलेली नाही हे सत्य आहे. परंतू हे सत्य सत्ताधारी आजही स्वीकारण्यास तयार नाहीत. 

पालिका प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार तसेच जीपीएस कंपन्या यांच्या साटेलोटयामुळे नालेसफाईचा करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे. नालेसफाईच्या गाळात अनेक अधिकारी आणि कंत्राटदार मालामाल झाले आहेत. दुसरीकडे सत्ताधारी आपली सत्ता असताना असे भ्रष्टाचार होत असताना असे भ्रष्टाचार रोखण्यास अपयशी ठरत आहेत. आपल्या कामातून कर्तव्यदक्षपणा दाखवणाऱ्या पालिका आयुक्त अजोय मेहता दोषी अधिकारी आणि कंत्राटदार, जीपीएस यंत्रणा पुरवणारी कंपनी यावर काय कारवाई करतात याकडे आता सर्व मिडिया आणि मुंबईकर जनतेचे लक्ष लागले आहे. दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई चौकशी अहवाला नंतर एफआयआर दाखल करू असे आयुक्तांनी पालिका सभागृहात आश्वासन दिले म्हटले होते. आता या आश्वासन कृती करण्याची वेळ आली आहे. आयुक्तांनी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सर्वच भ्रष्टाचार्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा मुंबईकर नागरिकांची आहे. 

अजेयकुमार जाधव 
मोबाईल ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages