दाभोळकर हत्याकांड - हायकोर्टाकडून सरकारची खरडपट्टी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दाभोळकर हत्याकांड - हायकोर्टाकडून सरकारची खरडपट्टी

Share This
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी गेल्या दोन वर्षांत छडा लावण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकार तसेच सीबीआयला उच्च न्यायालयाने चांगलेच धारवर धरले. या दोघांमध्ये तपासकामात समन्वय नसल्याचे उघड झाल्याने न्या. रणजीत मोरे आणि न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करून तपासाबाबतचा प्रगती अहवाल एका आठवड्यात सादर करा, असा आदेशच दोघांनाही दिला.
डॉ. दाभोळकरांच्या मारेकर्‍यांना अटक करण्यास अपयश आल्याने त्यांची कन्या मुक्ता दाभोळकर आणि पुत्र हमीद दाभोळकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्या. रणजीत मोरे आणि न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अभय नेवगी यांनी युक्तिवाद केला. सीबीआय तपास करत असली तरी आरोपींचा छडा लावण्यास गेल्या वर्षभरात अपयश आलेले आहे. तपासात कोणतीच प्रगती नाही, असा दावा करताना सीबीआयला साहाय्य करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेले सात अधिकारी राज्यांच्या विविध भागांतील असल्याने त्यांच्यात आणि सीबीआय अधिकार्‍यांमध्ये समन्वयच नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर खंडपीठाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. एकाच प्रकरणाचा तपास करणार्‍यांमध्ये समन्वय नसेल तर ही बाब दुर्दैवी आहे, अशी खंत न्यायालयाने व्यक्त केली. तसेच पुण्यात हत्येचा प्रकार घडलेला असताना पुण्याबाहेरील पोलीस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचा हेतू काय? असा सवाल उपस्थित करून राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले

पानसरेंच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करणार का ?कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपासासाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करणार का ? अशी प्रश्नार्थक विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकरकडे केली आहे. न्यायालयाने ही विचारणा करताना पोलीस तपासाचा प्रगत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पानसरे यांची कन्या स्मिता आणि सून मेघा यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अँड़ अभय नेवगी यांनी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करून तपास केला जावा. तर केतन तिरोडकर यांनी सीबीआयमार्फत चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पानसरे यांच्या हत्येला ८ महिने पूर्ण होत आले तरी पोलिसांना आरोपींचा तपास करण्यात अपयश आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि सतीश शेट्टी यांच्या हत्येला कित्येक वर्षे उलटली तरीही आरोपींचा तपास झालेला नाही. तशीच परिस्थित पानसरे यांच्या हत्येबाबतही निर्माण झाली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages