कॉ. पानसरे हत्या प्रकरण - रुद्र पाटीलच्या शोधासाठी पथके रवाना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॉ. पानसरे हत्या प्रकरण - रुद्र पाटीलच्या शोधासाठी पथके रवाना

Share This
मुंबई / कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात रुद्र पाटील याचा हात असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळे रुद्र पाटीलचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना झाली आहेत. रुद्रचे नातेवाईक व मित्रांकडे कसून चौकशी केली जात आहे; मात्र याबाबत पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे.

मडगाव स्फोटातील मृत मलगोंडा पाटील आणि त्यानंतर फरारी झालेला रुद्र पाटील (रा. काराजनगी, ता. जत) यांचे 'कनेक्शन' आहे काय, याची माहिती घेतली जात आहे. रुद्र कोठे आहे, याची आजपर्यंत कधीच चर्चा झाली नाही; पण कॉ. पानसरे हत्या प्रकरणात समीरला अटक झाल्यानंतर रुद्र चर्चेत आला. रुद्र व समीर हे चांगले मित्र होते. यापूर्वी ते बर्‍याच वेळा एकमेकाला भेटले असल्याचे समजते. गोव्यातील मडगाव येथे १६ ऑक्टोबर, २00९ रोजी स्फोट झाला होता. या स्फोटात 'सनातन'चा साधक मलगोंडा पाटील व योगेश नाईक हे दोघे ठार झाले. यावेळी तपास करणार्‍या एनआयए एजन्सीने 'सनातन'च्या साधकांसह ११ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. तपासात मलगोंडाचा मावस भाऊ रुद्र पाटील याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याला फरारी घोषित केले. स्फोटानंतर तो पुणे, मडगाव परिसरात आल्याचा दावा संशयितांच्या वकिलांनी २0१0 मध्ये केला होता.

मलगोंडा आणि रुद्र या दोघांचे गाव काराजनगी आहे. स्फोटानंतर रुद्र फरारी असल्याचे पोलीस सांगतात. गोवा, महाराष्ट्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत; परंतु अद्याप तो सापडलेला नाही. गेली चार ते पाच वर्षे पोलीस रुद्रला शोधत आहेत; पण तो सापडेला नाही. समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर रुद्रचे नाव चर्चेत आले आहे. समीर, मलगोंडा व रुद्र हे चांगले दोस्त होते, असे समजते. त्यांच्यात चर्चाही झाल्याचे बोलले जाते. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येत रुद्रचा काही सहभाग आहे का, याची माहिती काढली जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages