पदपथांवरील अतिक्रमणांबाबत महापालिकेची विशेष मोहीम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2015

पदपथांवरील अतिक्रमणांबाबत महापालिकेची विशेष मोहीम


अतिक्रमणे त्वरीत हटविण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश !
मुंबई / 29 Sep 2015 / प्रतिनिधी
महापालिका क्षेत्रातील विविध पदपथांवर उपहारगृहे, व्यावसायिक आस्थापना आदींनी अतिक्रमणे केल्याचे आढळून आले आहे. या अतिक्रमणांमुळे पादचा-यांना पदपथांवरुन चालणे कठीण होते. यामुळे पादचारी पदपथांऐवजी रस्त्यांचा वापर चालण्यासाठी करतात. रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता ही बाब पादचा-यांच्या जीवाला धोकादायक ठरु शकते, तसेच पादचारी पदपथांऐवजी रस्त्यांवरुन चालत असल्यास वाहतूक कोंडीत देखील भर पडते. या सर्व बाबी लक्षात घेऊन पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी दिले आहेत.


महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची विशेष मोहीम तातडीने सुरु करण्याचे आदेश आज दि.२९ सप्टेंबर, २०१५ रोजी देण्यात आले आहेत. या आदेशानुसार सर्व संबंधित सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील पदपथांचे पुढील दोन दिवसांत सर्वेक्षण करावयाचे आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार पाहणी पथके विभाग स्तरावर तयार करण्यात येतील. ह्या सर्वेक्षणा दरम्यान सर्व संबंधित पथकांनी पदपथांवरील अतिक्रमणांची छायाचित्रे घेण्याबाबतही आदेश देण्यात आले आहेत. संबंधित नियम व कार्यपध्दती यांच्या अधीन राहून पदपथांवर व्यवसायिक आस्थापने / उपहारगृहे यांच्याद्वारे करण्यात आलेली अतिक्रमणे सर्वोच्च प्राधान्य क्रमानुसार हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याबाबतचा अहवाल नियमित स्वरुपात उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलने) यांच्या मार्फत महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाकडे सादर करावयाचा आहे.

तसेच या विशेष मोहीमेबाबत सर्व संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर अवलोकन व पाठपुरावा करावा आणि त्याबाबतचा अहवाल नियमित स्वरुपात महापालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages