मुंबई- त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून बकरी ईदचा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या ईदच्या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. यात ‘कुर्बानी’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व असून त्यात मानवी कल्याण धार्मिक कर्तव्याचा भाग आहे. यामुळे या निमित्ताने त्याग, मानवी कल्याणांचा विचार जोपासण्यासाठी आणि इतरांचे जीव वाचवण्यासाठी हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या व राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ही ईद नागरिकांनी रक्तदान करून ती साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.
यंदा २४ सप्टेंबर रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने मानवाच्या कल्याणासाठी व धर्माच्या उन्नयनासाठी कालसापेक्ष बदल स्वीकारणे हे आवश्यक असते. मानवी रक्ताला जात किंवा धर्म नसते. इतरांचे जीव वाचवण्यासाठी आपले रक्त उपयोगी ठरते. यामुळे धार्मिक कर्तव्याचा भाग म्हणून या दिवशी रक्तदान करून हा सण साजरा करावा, असेही आवाहन अंनिसने केले.
ईदच्या दिवशी रक्तदानाचा कार्यक्रम हा हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम असून या दोन्ही समाजाच्या लोकांना सामावून घेऊन असे कार्यक्रम आयोजित केले जावेत. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात डॉ. नरेद्र दाभोलकरांची हत्या झाली मात्र त्यामागील सूत्रधाराचा शोध लागू शकला नाही. दाभोलकरांच्या खुनाचा निषेध आणि त्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी ईदच्या निमित्ताने प्राण्यांची कुर्बानी न देता, रक्तदान करावे असेही पाटील यांनी सांगितले.
