मुंबई- मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या कंत्राटांमध्ये दोषी ठरवून आझाद मैदान पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेल्या मेसर्स आकाश इंजिनिअरींग, मेसर्स आर.ई.इन्फ्रा आणि मेसर्स नरेश ट्रेडर्स या कंत्राटदारांना महापालिकेने मंगळवारी काळ्या यादीत टाकले. अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या समितीने तशी शिफारस केली होती, असे अभियांत्रिकी संचालक आणि पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर यांनी सांगितले.
काळय़ा यादीत टाकून प्रशासनाने या कंत्राटदारांना न्यायालयात जाण्याची संधी दिली. त्यामुळे ते दोषमुक्त होऊ शकतात, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला. यापेक्षा सर्व कंत्राटदारांची वेंडर कोड सिल करून इतर ठिकाणी सुरू असलेल्या त्यांच्या कंत्राट कामांचे पैसे रोखले पाहिजे होते. मलनि:सारण वाहिन्यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले होते. परंतु हेच कंत्राटदार न्यायालयात जावून पुन्हा निर्दोषत्व सिद्ध करत कामे मिळवायला मोकळे झाले. त्यापैकी काही कंत्राटदारांनी या नालेसफाईच्या कामांचीही कंत्राटे मिळवली असल्याचे त्यांनी सांगितले.
