मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज )
कायदा आणि सुव्यवस्था राखणारे पोलिसच अनेकदा कायद्याची पायमल्ली करताना दिसतात. मग हेल्मेट न घालणं असो वा अन्य काही. कायदा आपल्यासाठी नसतोच मुळी, अशी ज्या पोलिसांची भावना आहे, अश्या कायद्याच्या रक्षकांना राज्य सरकारने चपराक देत पोलिसांनी आपल्या कोणत्याही खासगी गाड्यांवर " पोलिस " लिहू नये असे परिपत्रक काढले आहे.
खासगी वाहनांवर 'पोलिस' असे लिहून मिरवणारे किंवा पोलिस विभागाच्या चिन्हाचं स्टिकर चिटकवणाऱ्या गाड्यांचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. कधी मामा तर कधी काका तर कधी फलाना फलाना पोलिस मध्ये आहे. असे सांगून आपल्या गाड्यांवर " पोलिस " लिहिण्याची फ्याशन झाली आहे. या गाड्या खासगी असल्याने पोलिस प्रशासनाच्या कामातही वापरल्या जात नाही. कोठेही अश्या गाड्या पार्किंग करण्यासाठी पोलिस नावाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पोलिस नसलेल्यांच्या गाड्यांवरही पोलिस लिहिले गेले आहे. राज्य सरकार पोलिस प्रशासनाला आपल्या कामासाठी शासकीय गाड्या पुरवत असल्याने नियमाप्रमाणे खासगी गाड्यांवर पोलिस लिहिणे बेकायदेशीर आहे. तरीही कायद्याचे रक्षण करणारे पोलिस आणि इतर लोकांकडून कायद्याचे उल्लंघन करून आपल्या खासगी गाड्यांवर " पोलिस " लिहिले जात होते.
मात्र आता महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने याची दाखल घेत गृह विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार दिनांक ७ सप्टेंबर २०१५ रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात कोणत्याही पोलिसाने आपल्या खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावणे किंवा पोलिस विभागाचे चिन्हा लावणे / चिटकवणे बेकायदेशीर असल्याच्या सूचना गृह विभागानेदिल्या आहेत. गृह विभागाच्या सूचनेचं जे पोलिस उल्लंघन करतील, त्यांच्यावर गृहविभागाकडून कारवाई केली जाणार आहे. राज्याच्या गृह विभागाच्या कक्ष अधिकाऱ्याकडून हे परिपत्रक काढले आहे. येणाऱ्या काळात कायद्याच्या रक्षकांनी बेकायदेशीरपणे आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर "पोलिस " लिहिलेल्या पाट्या आणि स्टीकर किंवा चिन्ह न काढल्यास अश्या गाड्यांवर कारवाई होणार आहे.

