महाराष्ट्रात हत्या प्रकरणांत महिलांचा सहभाग वाढतोय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्रात हत्या प्रकरणांत महिलांचा सहभाग वाढतोय

Share This
मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात गेल्या वर्षी घडलेल्या हत्या प्रकरणांत तब्बल ५७९ महिलांना अटक करण्यात आली. अटक महिलांचे हे प्रमाण उर्वरित राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने(एनसीआरबी) गेल्या वर्षातील गुन्हेगारीचा अहवाल नुकताच सादर केला. त्या अहवालातून महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे हे धक्कादायक चित्र पुढे आले आहे. हत्येच्या आरोपासह हत्येस प्रवृत्त करणे आणि सदोष मनुष्यवध या आरोपांखाली अटक महिलांच्या यादीत महाराष्ट्राचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आलेल्या महिलांचे प्रमाणही ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे एनसीआरबीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात हत्येप्रकरणी ५७९ महिलांना अटक करण्यात आली.


उत्तर प्रदेश-४७२, कर्नाटक-३३0, पश्‍चिम बंगाल-३१७ आणि मध्य प्रदेशात ३१६ महिला आरोपी गजाआड झाल्या. विशेषत: ३0 ते ४५ वर्ष वयोगटातील महिलांच्या हातून अधिक गुन्हे घडले. त्यापाठोपाठ १८ ते ३0 वर्ष वयोगटातील महिलांचे प्रमाण आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात विविध गुन्ह्यांसाठी १ लाख ९४ हजार ८६७ महिलांना अटक करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील ३0,५६८ महिलांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश(१७,४३७) राजस्थान(१६,१८७) गुजरात(१४,१५२) आणि पश्‍चिम बंगाल(१२,१८१) या राज्यांचा क्रमांक लागतो. २0१२ ते २0१४ दरम्यान महाराष्ट्रात ९५,१७४ महिलांना अटक करण्यात आली. हत्येच्या आरोपासह हत्येस प्रवृत्त करणे, सदोष मनुष्यवध, अत्याचार, अत्याचारास प्रवृत्त करणे, अपहरण, दरोडा, दंगल, फसवणूक, हुंडाबळी, महिलांवर हल्ला, बेदरकार ड्रायव्हिंग अशा विविध प्रकारच्या गुन्हेगारीत महिलांचा टक्का वाढतो आहे. गुन्हेगारीत पुरुषांबरोबरच महिलांचे वाढते प्रमाण महाराष्ट्राच्या प्रगतीपुढे मोठे आव्हान उभे करत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे व्हावेत व त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, असे मत तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत. गुन्हेगारीतील महिलांच्या वाढत्या सहभागामागे अनेक सामाजिक, भावनिक आणि आर्थिक कारणे असल्याचे मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते डीसीपी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages