मुंबई दि.१३- मुळातच शिष्यवृत्ती परीक्षा हि बालकाच्या विशेष बुद्धिमत्तेचे मापन करण्यासाठी घेतल्या जातात. त्यामुळे मूळ तीन विषयांचाच शिष्यवृत्ती परीक्षेत समावेश असावा असा आग्रह शिक्षक पालकांकडून केला जात होता. या मागणीचा विचार करण्यासाठी शासनाने www.surveymonkey.com/r/ schoolscholar या संकेत स्थळावर आपली मते नोंदवावीत; या मतांचा विचार करून शिक्षण तज्ज्ञांच्या मदतीने शिष्यवृत्ती परीक्षांची पुनर्मांडणी करण्यात येईल,असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
एप्रिल २०१० पासून राज्यात बालशिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. कायद्यानुसार शालेय स्तर रचनेत बदल झाले. इ. १ली ते ५वी प्राथमिक स्तर, इ. ६वी ते ८वी उच्च प्राथमिक स्तर, इ. ९वी ते १०वी माध्यमिक स्तर झाले आहेत असे विनोद तावडे यांनी सांगितले, यानुसार इ. ४थी व ७वी मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांचे निकष बदलणे क्रमप्राप्त होते. परंतु हा निर्णय अनेक वर्षे प्रलंबित होता. २९ जून २०१५ रोजी शासन निर्णयाद्वारे शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५वी व इ. ८वी मध्ये घेण्याचा शासन निर्णय झाला असे तावडे यांनी स्पष्ट केले. साधारणतः ८-१० वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेतील विषयांमध्ये फेरफार झाले. गणित, प्रथम भाषा, बुद्धिमत्ता या तीन प्रमुख विषयांमध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, इंग्रजी या विषयांचा समावेश केला होता. त्यामुळे आता शिक्षण तज्ज्ञांच्या मदतीने शिष्यवृत्ती परीक्षांची पुनर्मांडणी करण्यात येईल,असेही तावडे यांनी सांगितले
