बिल्डर, अधिकाऱ्यांवर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा
मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, पोलिस आयुक्तांकडे मागणी
मुंबई / अजेयकुमार जाधव
म्हाडामधील काही भ्रष्ट अधिकार्यांनी चेंबूर येथील सहकार नगर मधील साईबाबा नगर या दलित वस्तीमधील झोपडीधारकांसाठी असलेली अधिकृत पायवाट बिल्डरच्या घशात घातली आहे. असा प्रकार उघडकीस आल्यावर येथील रहिवाश्यांनी पुराव्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना निवेंदन दिले आहे. निवेदनात बिल्डर आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांविरोधात अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी साईबाबा नगर रहिवाशी सेवा संघाचे सचिव रमेश रामदास मोकळ व माता रमाई महिला सेवा संघाच्या छाया बाबुराव शिंदे वतीने करण्यात आली आहे.
चेंबूर सहकार नगर येथे साईबाबा नगर हि झोपडपट्टी ५० वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात आहे. या ठिकाणी सीटीएस क्रमांक ५८ मधील इमारत क्रमांक १, २, ३ या तीन इमारतींचा पुनर्विकास केला जात आहे. इमारत क्रमांक १ आणि २ च्या मधून साईबाबा नगर झोपडपट्टीला पायवाट जात होती. म्हाडाच्या १९७९ सालच्या नकाशात हि पायवाट दाखवण्यात आली होती. हि पायवाट मान्य करत विणा डेव्हलपर्स या बिल्डरने गेल्या वर्षी रहिवाश्यांना पर्यायी पायवाट उपलब्ध करून दिली. मुळच्या पायवाटेवर बांधकाम केल्यावर आता बिल्डरने तात्पुरती पायवाटही हडपण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याबाबत म्हाडाकडे संपर्क साधल्यावर म्हाडा आणि बिल्डरने २०१३ च्या नकाशातून सदर पायवाट गायब केल्याचे उघड झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
साईबाबा नगर येथील ५ हजार रहिवाशी टाटा विद्युत वाहिनीच्या खाली आपला जीव मुठीत घेवून राहत आहेत. या ठिकाणी काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास झोपडपट्टीकडे जाण्या येण्यास मार्ग उपलब्ध नाही. यामुळे आपत्कालीन परिस्थिती या ठिकाणी राहणाऱ्या ५ हजार रहिवाश्यांचा मृत्यू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.आपत्कालीन काही प्रकार घडल्यास म्हाडाच्या विणा डेव्हलपर्स, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे असे निवेदनात म्हंटले आहे. पोलिससुद्धा बिल्डरच्या हाताचे बाहुले बनून दडपशाही करत असल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर ठिय्या आंदोलन करून रस्ता रोको करतील असा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांच्या विरोधात नवे पोलिस आयुक्त अहमद जावेद यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.
