तीवर संरक्षण प्रतिष्ठान स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तीवर संरक्षण प्रतिष्ठान स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय

Share This

मुंबई / प्रतिनिधी
राज्यात तीवर संरक्षण प्रतिष्ठान स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. कांदळवन संवर्धनाच्या अधिक परिणामकारक प्रयत्नांसाठी व किनाऱ्यावरील जनतेच्या जीवनमानात सकारात्मक प्रभाव आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे. 


राज्याच्या सुमारे ७२० किमी किनारपट्टीवर जवळ जवळ २९८३९ हेक्टर क्षेत्र कांदळवन क्षेत्र आहे. त्यापैकी सरकारी जमिनीवरील सुमारे १६५५४ हेक्टर क्षेत्र खाजगी जमिनीवरील सुमारे १३२८५ हेक्टर कांदळवन क्षेत्र आहे. राज्य वन्यजीव मंडळाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे नवी मुंबई विमानतळाच्या मूल्याच्या ३ टक्के निधी म्हणजेच रु ११५.७१ कोटी रक्कम कांदळवनाच्या संवर्धनासाठी वन विभागाकडे जमा केली आहे. सदर निधी तीवर संवर्धन प्रतिष्ठान याचा आधार म्हणून जमा केल्यास त्याच्या व्याजातून प्रतिष्ठानाचे कामकाज वर्षानुवर्ष चालू राहील व शासनावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही तसेच या करिता कोणतेही नवीन पद निर्माण करण्यात येणार नाही. इतर प्रकल्पाकरिता कांदळवनाच्या जमिनीचे वळती कारण झाल्यास त्या ऐवजी प्राप्त होणारी रक्कम देखील प्रतीष्ठानाकडे जमा होईल. तसेच तीवर संवर्धन प्रतिष्ठान तिवरांचे संवर्धन सागरी जीव विविधता त्यावर आधारित उपजीविकांची साधने, रोजगार, पर्यटन इत्यादी क्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावेल.

किनाऱ्यावर राहणाऱ्या  जनतेच्या उपजीविकेसाठी खेकडा पालन, मधु मक्षिका पालन व इतर अनुषंगिक कांदळ वनावर आधारित उत्पन्न वाढीच्या कार्यक्रमाची वाढ करणे, कांदळ वने व सागरीय जैव विविधता यावर संशोधन,  प्रशिक्षण व लोकजागृती कार्यक्रमाना पुरस्कृत करणे, कांदळ वन क्षेत्राचा पर्यटनासाठी पुरेपूर वापर करणे व सागर किनाऱ्यावर पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास करणे, तिवरांचे संवर्धन , वृद्धी व शास्त्रोक्त व्यवस्थापनासाठी तंत्रशुद्ध उपाययोजनांची आखणी व अंमलबजावणी करणे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर कांदळ वनाच्या रोपवनांचा कार्यक्रम घेणे, शहरी नागरिकांना कांदळ वन संवर्धनाची आवड व जनजागृती करण्याच्या दृष्टीने शहराच्या लागत असणाऱ्या कांदळवनांना मनोरंजनाची ठिकाणे व पदपथ व माहिती केंद्रे इत्यादींचा विकास करणे, प्रवाळ , कासव, डॉल्फिन, देवमासा इत्यादी नष्टप्राय जलचर प्राण्यांचे संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करणे, सागर किनारे व चौपाट्या स्वच्छ ठेवत प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी कार्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी करणे हि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तीवर संवर्धन प्रतिष्ठान कटिबध्द असेल. 

२३ सदस्यीय या प्रतिष्ठानाचे पालक मुख्यमंत्री असून वन मंत्री हे अध्यक्ष असतील. तसेच मुख्य वन संरक्षक कांदळवन कक्ष, मुंबई हे प्रतिष्ठानाचे सदस्य सचिव असतील. सदर समितीचे काम जलद गतीने होण्यासाठी ९ सदस्यीय कार्यकारी समिती देखील गठीत करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages