देवनार व मुलुंड क्षेपणभूमी बंद करण्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देवनार व मुलुंड क्षेपणभूमी बंद करण्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

Share This
मुंबई : देवनार आणि मुलुंड क्षेपणभूमी बंद करण्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. यासंबंधी कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तळोजा येथील प्रस्तावित क्षेपणभूमी सुरू होईपर्यंत देवनार क्षेपणभूमीवर घनकचरा टाकण्याची कार्यपद्धती सुरू ठेवण्यात येणार आहे. घनकचरा टाकण्यासाठी क्षेपणभूमी म्हणून तळोजा येथील जागेचा वापर करण्यास महापालिकेने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या जागा महाराष्ट्र शासनाकडून महापालिकेकडे हस्तांतरीत होणे अद्याप बाकी असल्याचे महानगर पालिकेने कळविले आहे.
मेसर्स तत्व ग्लोबल एन्व्हॉयर्नमेंट (देवनार) लिमिटेड यांना देवनार येथील क्षेपणभूमी वर्ष २00९ मध्ये हस्तांतरीत करण्यात आली होती, तर मुलुंड येथील क्षेपणभूमी मेसर्स तत्त्व ग्लोबल रिन्युएबल एनर्जी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांना २0१0 मध्ये हस्तांतरीत करण्यात आली होती. संबंधित कंत्राटदाराने देवनार येथील क्षेपणभूमी बंद करण्याबाबतची कार्यवाही करणे तसेच ठिकाणी दररोज २000 मेट्रिक टन इतक्या कचर्‍यावर प्रक्रिया करणे शक्य होईल, अशी क्षमता असलेले प्रकल्प (कंपोस्ट प्लाँट) उभारणे अपेक्षित होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने याबाबत योग्य ती कार्यवाही केली नाही. त्याचबरोबर मुलुंड क्षेपणभूमीबाबत संबंधित कंत्राटदाराने दररोज ५00 मेट्रिक टन इतक्या कचर्‍यावर प्रक्रिया करता येईल, असा प्रकल्प उभारणे व क्षेपणभूमी बंद करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित होते. तरीही संबंधित कंत्राटदाराने याबाबत योग्य ती अपेक्षित कार्यवाही केली नाही. दोन्ही कंत्राटदार घनकचर्‍याची वाहतूक करण्यापलीकडे कार्य करीत नसल्याचेही दिसून आले. वरील तपशिलानुसार महापालिकेने दोन्ही कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.त्यानुसार कंत्राट रद्द करण्याची नोटीस मुलूंड क्षेपणभूमीच्या कंत्राटदारास पाठविण्यात आली आहे. तर देवनार क्षेपणभूमी बंद करण्याच्या कार्याचे कंत्राटदारास कंत्राट रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages