मुंबई : मुंबईकरांची दुसरी लाईफलाइन असलेली बेस्ट आर्थिक संकटात आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत . यालाच यश येवून अँडलॅब इमॅजिका थीम पार्क मनोरंजन उद्यानातील कर्मचारी आणि तेथे जाणार्या पर्यटकांच्या सोयीसाठी बेस्टच्या गाड्या भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव अँडलॅबने बेस्ट प्रशासनाकडे पाठविला असून या प्रस्तावावर बेस्ट प्रशासन सकारात्मक विचार करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
| बेस्टचा परिवहन विभाग तोट्यात आहे. गेल्या २ वर्षांत बेस्टची प्रवासी संख्या ४१ लाखांहून २८ लाखांवर आली आहे. बेस्टच्या विद्युत विभागाच्या ग्राहकांकडून वसूल करण्यात येणारा परिवहन सेवा अधिभार २0१६ पासून वसूल करता येणे शक्य नाही. त्यामुळे बेस्टच्या परिवहन विभागाची आर्थिक स्थिती आणखी बिकट होणार आहे.आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली असतानाच अँडलॅब्ज या खाजगी कंपनीने बेस्टकडे भाडेतत्त्वावर गाड्या देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. अँडलॅब इमॅजिका या अँडलॅब्जच्या खोपोली येथील मनोरंजन उद्यानातील कर्मचारी आणि तेथे जाणारे पर्यटक यांच्यासाठी या बसेस वापरण्यात येणार आहेत. यासाठी अँडलॅब्जला काही एसी आणि काही साध्या बसेसची आवश्यकता आहे. दर दिवशी या बसेस बोरिवली, दादर, सीएसटी येथून अँडलॅब इमॅजिकासाठी निघतील. या प्रस्तावामुळे बेस्टच्या आगारांत उभ्या असलेल्या अनेक बसेस रस्त्यांवर येतील आणि त्यामुळे बेस्ट प्रशासनाला महसूल मिळणार आहे. या प्रस्तावाबाबत सकारात्मक विचार सुरू असून लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असे महाव्यवस्थापक डॉ.जगदीश पाटील यांनी सांगितले. |
