मुंबई : मुलुंड आणि देवनार येथील क्षेपणभूमीचे कंत्राट अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला असून देखभालीत विसंगती आणि अनियमितता झाल्याचा ठपका ठेवून कंत्राट रद्द करण्यात आले आहे.
देवनार आणि मुलुंड क्षेपणभूमी बंद करण्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली होती. मेसर्स तत्त्व ग्लोबल एन्व्हॉयर्नमेंट (देवनार) लिमिटेड यांना देवनार येथील क्षेपणभूमी वर्ष २00९ मध्ये हस्तांतरीत करण्यात आली होती, तर मुलुंड येथील क्षेपणभूमी मेसर्स तत्त्व ग्लोबल रिन्युएबल एनर्जी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांना २0१0 मध्ये हस्तांतरीत करण्यात आली होती. संबंधित कंत्राटदाराने देवनार येथील क्षेपणभूमी बंद करण्याबाबतची कार्यवाही करणे तसेच या ठिकाणी दररोज २000 मेट्रिक टन इतक्या कचर्यावर प्रक्रिया करणे शक्य होईल, अशी क्षमता असलेले प्रकल्प (कंपोस्ट प्लाँट) उभारणे अपेक्षित होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने याबाबत योग्य ती कार्यवाही केली नाही. त्याचबरोबर मुलुंड क्षेपणभूमीबाबत संबंधित कंत्राटदाराने दररोज ५00 मेट्रिक टन इतक्या कचर्यावर प्रक्रिया करता येईल, असा प्रकल्प उभारणे व क्षेपणभूमी बंद करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने याबाबत योग्य ती अपेक्षित कार्यवाही केली नाही. वरील दोन्ही प्रकल्प सार्वजनिक व खाजगी भागीदारी तत्त्वावर पूर्ण होणे अपेक्षित होते. मुंबई महापालिकेद्वारे वारंवार पाठपुरावा व पत्रव्यवहार करून देखील दोन्ही कंत्राटदारांद्वारे अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले.

