अॅम्ब्युलन्ससाठी ‘गिव्ह मी वे’ मॉक ड्राइव्ह - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अॅम्ब्युलन्ससाठी ‘गिव्ह मी वे’ मॉक ड्राइव्ह

Share This

मुंबई - भीषण अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने देशात दरवर्षी १२ लाखांपेक्षा जास्त जणांना प्राण गमवावा लागतो. जखमींना कमीत कमी वेळेत अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने शनिवारी नानावटी रुग्णालयाने ‘गिव्ह मी वे’ नावाने मॉक ड्राइव्ह केले. त्याद्वारे शहराच्या विविध भागांतून अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णांना रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शनिवारी सकाळी ११ वाजेपासून मुंबईच्या विविध भागांतून अॅम्ब्युलन्स निघाल्या. त्या विलेपार्लेस्थित नानावटी रुग्णालयांत पोहोचण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागली. मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले आणि सांताक्रुझ भागात ही चाचणी घेण्यात आली. नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे अध्यक्ष अभय सोई यांनी सांगितले की, रुग्ण वेळेत रुग्णालयापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता लक्षात घेऊनच हे मॉक ड्राइव्ह करण्यात आले. त्याचबरोबर शनिवारी २४ तास खुले राहणारे ‘अॅक्सिडेंट अँड इमर्जन्सी सेंटर’ सुरू करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच माजी केंद्रीय मंत्री तथा अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होते. मुंबईत ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतर शहरांतही अशी चाचणी घेण्याबाबत विचार होऊ शकतो. त्यामुळे कमीत कमी वेळेत गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले जाऊ शकेल आणि त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करणे शक्य होईल.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, हृदय प्रत्यारोपणासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’प्रमाणे अॅम्ब्युलन्ससाठी फ्री वे सुविधा देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. याबाबत इतर विभागांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages