अडचणीत येण्याच्या भीतीने भाजपा अध्यक्षांनी मिडियाला टाळले
मुंबई - "नियमात राहून दहीहंडी साजरी कशी करतात हे पाहायचे असेल, तर वांद्य्राला या‘, असे आव्हान देणाऱ्या भाजपच्या मुंबई अध्यक्षांच्या डोळ्यांदेखत गोविंदांनी नऊ थर रचून नियम मोडले. इतर वेळी ते बेधडकपणे माध्यमांना सामोरे जाणाऱ्या शेलार यांनी दहीहंडी प्रकरणी केलेल्या नियमभंगामुळे अडचणीत येऊ शकतो, अशी शक्यता दिसताच माध्यमांना दिवसभर टाळले. सोमवारी पालिका आयुक्तांना भेटण्यास आलेल्या शेलार यांनी मौन बाळगल्याने पालिका वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपानेच नियमभंग केल्याने या नियमभंगाबाबत पोलिसी कारवाई कधी होणार, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.
दहीहंडी साजरी करण्यासाठी नियम ठरवण्यात आल्याने अनेक आयोजकांनी उत्सवातून माघार घेतली होती आणि त्याचा परिणाम रविवारी (ता. 6) मुंबईच्या रस्त्यांवर दिसला. या नियमांना विरोध करणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर शेलार यांनी जोरदार टीका केली होती. "नियमात राहून गोपाळकाला कसा साजरा करायचा हे पाहायचे असेल, तर वांद्रे येथे या‘ असे आव्हान त्यांनी दिले होते. प्रत्यक्षात त्यांच्या हंडीसाठी गोविंदांनी नऊ थर रचून नियमांचे उल्लंघन केले. हा नियमभंग होत असताना शेलार स्वत: व्यासपीठावर होते.
महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी ते येणार असल्याचे समजताच पत्रकारांची गर्दी आयुक्तांच्या कार्यालयाजवळ जमली. मात्र, इतर वेळी भूमिका मांडायला लगेच तयार होणाऱ्या शेलार यांचे या वेळी वेगळेच रूप दिसले. त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळत काढता पाय घेतला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला होता; मात्र सत्ताधारी पक्षाचे मुंबई अध्यक्ष असलेल्या शेलार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरून विरोधक पुन्हा आक्रमक झाले असून, त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
