मुंबई - परतीचा पाऊस हजेरी लावू लागल्यानूे मुंबईत डेंग्यूचा धोका वाढला आहे. डेंगीचा प्रसार करणाऱ्या एडीस डासांची पैदास करणारी तब्बल दीड हजारे ठिकाणे मुंबई पालिकेला सापडली आहेत; त्यातील सर्वाधिक 1350 ठिकाणे इमारतींमध्ये आहेत.
डेंग्यू पसरवणारे एडीस आणि हिवताप पसरवणाऱ्या ऍनाफिलिस डासांची पैदास साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पाणी साचण्याची ठिकाणे वाढली असल्यामुळे डासांची पैदासही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा डासांचा शोध सुरू केला आहे. पालिकेने महिनाभरात केलेल्या पाहणीत मुंबईतील तब्बल 1,504 ठिकाणी एडीस डास आढळले. या ठिकाणांपैकी 1350 ठिकाणे इमारतींच्या परिसरात; झोपडपट्टी परिसरात 154 ठिकाणे आहेत. त्यामुळे इमारतींमधील रहिवाशांना डेंग्यूचा धोका अधिक आहे.
पालिकेने शुक्रवारी (ता. 18) जुहू येथील गझदरबंद परिसरात तपासणी केली; त्यात एका ठिकाणी ऍनाफिलिस आणि दोन ठिकाणी एडीस डास आढळले. पालिकेने या भागातील 1978 घरांची तपासणी करून हे डास शोधून काढले आहेत. घरामधील फूलदाणी, वापरात नसलेले टायर, नारळाच्या करवंट्या, रंगाचे रिकामे डबे अशा पाणी साचणाऱ्या वस्तूंमध्ये या डासांची पैदास होते.
