मुंबई, दि. 24 Sep 2015:
सनातन बंदीबाबत सरकार प्रतिकूल आहे. पुरावे मिळाल्यास सनातनवर बंदी घालू, असे गृहराज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. परंतु, भाजप सरकारच्या लेखी पुराव्यांची नेमकी व्याख्या तरी काय, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
सावंत यांनी आज दुपारी गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत घेतली. याप्रसंगी ते म्हणाले की, कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सनातनचा सक्रिय सहभाग असल्याचे आजवरच्या तपासात दिसून आले आहे. सनातनचे नियतकालिक सनातन प्रभात पत्रकारांना जाहीरपणे धमक्या देत आहे. सनातनविरूद्ध कारवाई करणा-या पोलिसांना कठोर शिक्षेची धमकी दिली जात आहे. हे पुरावे नाहीत का? बंदी तर दूरच पण् या धमक्यांच्या आधारे सनातनच्या प्रमुखाला आणि सनातन प्रभातच्या संपादकाला साधी अटक करण्याची हिंमत भाजपचे सरकार दाखवू शकलेले नाही, अशी टीका करून सनातनवर तातडीने बंदी घालण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला.
मुळात भाजप सरकारची सनातनवर कारवाई करण्याची इच्छाच नाही. त्यामुळेच पुराव्यांची सबब दिली जात आहे. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये ठोस पुरावे होते. महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आदींच्या प्रकरणांमध्ये अनेक पुरावे होते. प्रसारमाध्यमांनीही त्या पुराव्यांच्या आधारे बातम्या केल्या होत्या. परंतु, सर्व पुराव्यांकडे दुर्लक्ष करून या सरकारने कारवाईला बगल दिली. आताही पुराव्यांच्या नावाखाली सनातनविरूद्ध कारवाई टाळली जात असल्याचे सचिन सावंत म्हणाले.
नागपूरमध्ये अलिकडेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला भाजयुमोचा उपाध्यक्ष सुमित ठाकूर याने प्रा. मल्हारी म्हस्के यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्याची तक्रार नोंदवून घ्यायला नागपूर पोलिस तयार नव्हते. प्रा. म्हस्के यांच्या घरी झालेल्या तोडफोडीचे व्हीडीओ खासगी वृत्तवाहिन्यांवर प्रसारीत झाले. हा ठोस पुरावा नव्हता का ? सरतेशेवटी घटनेच्या आठ दिवसानंतर मीडियाच्या दबावामुळे पोलिसांना तक्रार नोंदवून घ्यावी लागली. या प्रकरणात अॅट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल झालेला असतानाही अद्याप भाजपच्या सदर पदाधिका-याला अटक झालेली नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात गुन्हेगारांविरूद्ध कारवाई करण्यास पोलिस धजावत नसतील तर सनातनसारख्या राजकीयदृष्ट्या प्रचंड अडचणीच्या मुद्यावर मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतील, असे वाटत नसल्याचे सावंत यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये सनातनचे हस्तक व समर्थक
शिवसेना आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसारखे अनेक भाजप नेते जाहीरपणे सनातनची बाजू घेत आहेत. सरकारमधील सनातनचे असेच पाठिराखे सनातला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे सनातनपर्यंत पोहोचल्याने कर्नाटक पोलिस महाराष्ट्रात दाखल झाले होते. महाराष्ट्र पोलिसांच्या अगोदर कर्नाटक पोलिसांनी सनानतच्या कार्यकर्त्यांना अटक केली असती तर येथील सरकारची नाचक्की झाली असती. त्यामुळे त्यांना सनातनविरूद्ध कारवाई करण्यास भाग पडले. सनातनचे सरकारमधील आश्रयदाते आणि सनातनला आर्थिक रसद पुरविणा-यांची माहिती समोर येणे आवश्यक असल्याचे सावंत पुढे म्हणाले.
शिवसेना नेते व राज्यातील वरिष्ठ मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्याच अखत्यारीतील उद्योग मंत्रालयाच्या प्रश्नांवर राज्यपालांना भेटून मागणी करण्याच्या प्रकारावरही सचिन सावंत हल्लाबोल केला. ते म्हणाले की, एखाद्या मंत्र्याने आपल्याच विभागातील कामांसाठी राज्यपालांकडे मागणी मांडण्याचा प्रकार विरळाच आहे. शिवसेनेचे अन्य मंत्री रवींद्र वायकर यांनीही शिक्षण धोरणांसंदर्भात अलिकडेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाची ही पद्धत पाहता त्यांना सरकारमध्ये अजिबात स्थान नसल्याचे स्पष्ट होते. शिवसेना नेहमी स्वाभिमानाच्या गप्पा मारते. तीच शिवसेना एवढी लाचारी पत्करून नेमक्या कोणत्या लालसेपोटी सरकारमध्ये कायम आहे, अशी विचारणाही सचिन सावंत यांनी केली.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या खुल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराच्या भाषेवर काँग्रेस प्रवक्त्यांनी आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रामध्ये ज्या भाषेचा वापर केला, ती भाषा मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित नव्हती आणि शोभनीय देखील नव्हती. जी तत्परता मुख्यमंत्र्यांनी सरदेसाईंना पत्र लिहिण्यात दाखवली, तीच तत्परता ते आजवर शेतक-यांबाबत दाखवू शकलेले नाहीत.
अकोल्याचे तरूण शेतकरी मंगेश उमाळेंनी दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून आत्महत्या केली. ते मुख्यमंत्र्यांचे फॅन होते. मुख्यमंत्र्यांनी माझ्या घरी येऊन कुटुंबांचे सांत्वन करावे, अशी अंतिम इच्छा मंगेश उमाळे यांनी त्या पत्रात नमूद केलेली होती. त्या शेतक-याच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी आजवर दखल घेतलेली नाही, याकडेही सचिन सावंत यांनी लक्ष वेधले.

