२९ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण
मुंबई / अजेयकुमार जाधव / 4 Oct 2015
मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागात इमारत विभागात कार्यरत असलेले अंजुमन नेवरेकर आणि दुय्यम अभियंता प्रसाद भगत या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे विभागात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर चौकशीअंती ठपका ठेवण्यात आला असल्याने या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, पालिका आयुक्त, लाच लुचपत विभाग यांच्याकडे सामाजिक व आटीआय कार्यकर्ते महेश उर्फ बाळा वेंगुर्लेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
पालिकेच्या ई विभागात इमारत विभागात काम करणारे अंजुमन नेवरेकर यांच्या विरोधात ३ प्रकरणात चौकशी सुरु आहे. यामध्ये एका प्रकरणात १००० रुपये दंड लावण्यात आला असून न्यायालयीन कारवाईनंतर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. दुसर्या एका प्रकरणात नेवरेकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तर तिसर्या एका प्रकरणात उप प्रमुख अभियंता (पाप्रप) चौकशी अधिकारी यांच्याकडे चौकशी साठी कागदपत्रे पाठवण्यात आली आहेत. दुय्यम अभियंता प्रसाद भगत यांच्यावर ५ प्रकरणी चौकशी सुरु असून एका प्रकरणात त्यांना दोषमुख्त करण्यात आले आहे. इतर चार प्रकरणापैकी एका प्रकरणात भागात यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. एका प्रकरणात ५० हजार रुपये तर आणखी एका प्रकरणात २ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर एका प्रकणात दोषी ठरवायचे कि निलंबन करायचे याचा निर्णय न्यायालयीन कारवाईनंतर घेण्यात येणार आहे.
नेवरेकर आणि भगत यांच्यावर आरोप आणि दोष सिद्ध झाले असताना त्यांना इतर खात्यात बदली करण्याऐवजी त्याच विभागात कार्यरत ठेवण्यात आले आहे. नेवरेकर आणि भागात यांच्या कार्यकाळात ई विभागात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. ई विभागातील अनधिकृत बांधकामाची एक प्रत आणि मुकादम केरोजी हे कनिष्ठ अभियंत्यांच्या खुर्चीवर बसून लाच मागतानाचा फोटो व इतर पुरावे तक्रारीबरोबर जोडण्यात आले आहे. या तक्रारीची दाखल घेवून मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा येत्या २९ ऑक्टोबर पासून ई विभाग कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करू असा इशारा वेंगुर्लेकर यांनी दिला आहे.
