सनातनचा गोव्यातील आश्रम त्वरित बंद करा - गावकऱ्यांची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सनातनचा गोव्यातील आश्रम त्वरित बंद करा - गावकऱ्यांची मागणी

Share This

मुंबई - 2 Oct 2015 - भाकप नेते कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या तसेच मडगाव, नवी मुंबई व ठाणे येथील बॉम्बस्फोटांत सनातन संस्थेचा हात आहे, असा आरोप करत गोव्यातील बांदोडा गावच्या रहिवाशांनी सनातनचा या गावातील रामनाथी आश्रम आठवडाभरात बंद करावा, अशी मागणी गोवा सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी नुकतीच आश्रमासमोर तीव्र निदर्शनेही करण्यात आली.
आश्रम बंद करण्यासंदर्भात बांदोडा ग्रामपंचायतीनेही ठराव करून तो गोवा सरकारकडे पाठवला आहे. पुढच्या आठ दिवसांत आश्रम बंद केला नाही तर संपूर्ण गोवा राज्यात सनातनविरोधात आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. सनातन संस्थेला गोयंकरांचा अजिबात पाठिंबा नाही. तसेच लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या भाजप सरकारचाही सनातन संस्थेला पाठिंबा नाही. मात्र, स्थानिक आमदार व सार्वजनिक बांधकाममंत्री असलेल्या एमजी पक्षाच्या सुदीन ढवळीकर यांचा सनातन संस्थेला वरदहस्त आहे, असा आरोप गावकरी सौरभ लोटलीकर यांनी केला. या आश्रमात गावातील एकाही व्यक्तीचा सहभाग नाही. आश्रमात हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे गावाची बदनामी टाळण्यासाठी आश्रम बंद करावा, अशी मागणी रामनाथी मंडळाने केल्याचे या मंडळाचे अध्यक्ष लोटलीकर यांनी सांगितले.

आरोप 
बांदोडा गावी सनातन संस्थेचे असलेले मुख्य कार्यालय गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापेक्षा मोठे आहे. ही मंडळी आत काय काय करतात याची काही माहिती गावकऱ्यांना नसते. 
२००९ मध्ये सनातनच्या आश्रमाकडून बांदोडा गावच्या आरोग्य केंद्रातून मोठ्या प्रमाणात कंडोम (निरोध) मागवले होते. त्यामुळे या आश्रमात अध्यात्मापेक्षा इतर गोष्टीच चालतात, असा गावकऱ्यांना संशय आहे.

सनातन संस्थेविरोधात आंदोलन करणारे बांदोडा गावचे युवक, गावकरी सर्व हिंदूधर्मीय आहेत. आम्हाला सनातन संस्थेकडून हिंदू धर्म शिकण्याची गरज नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages