आग आणि पालिकेला आली जाग..... - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आग आणि पालिकेला आली जाग.....

Share This

मुंबईमध्ये गॅस गळती आणि गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे मुंबई महानगर पालिकेचा बेफिकीर कारभार समोर आला आहे.  १६ ऑक्टोबरला कुर्ला पश्चिम येथील ‘सिटी किनारा’ या हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर १७ ऑक्टोबरला सकाळी विक्रोळी पार्क साईट भागातील वर्षानगरमध्ये एका घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सहाजण जखमी झाले असून, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

कुर्ला पश्चिम येथील प्रीमियर मार्गावरील हॉलिक्रॉस शाळा आणि सिटी कोहिनूर मॉलसमोर ‘सिटी किनारा’ या हॉटेलात दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली. हे हॉटेल तळ अधिक पहिला मजला असे आहे. या हॉटेलच्या वरच्या मजल्यावर भोजनाची व्यवस्था असून तळमजल्यावर चायनीय फास्ट फुडसह इतर खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यामुळे यासाठी लागणारे सिलिंडर हे पहिल्या मजल्यावर ठेवून पाईपच्या सहाय्याने गॅस तळ मजल्यावर नेण्यात आला होता. त्यामुळे यातून गॅसची गळती होऊन तेथे ठिणगी पडून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी वर्तवला आहे.  या आठही जणांचे मृतदेह एवढे गंभीर भाजलेले आहेत, की त्यांची ओळख पटणेही मुश्कील झाले आहे. ती पटवण्याचे काम पोलिसांमार्फत सुरू असून पुढील तपास स्थानिक पोलीस व अग्निशमन दलामार्फत सुरू आहे. 

कुर्ल्याच्या सिटी किनारा हॉटेलमध्ये सिलेंडर स्फोटाची घटना ताजी असतानाच, शनिवारी (१७ ऑक्टोबर ) सकाळी विक्रोळीच्या पार्क साईट भागातील वर्षानगरमध्ये एका घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सहाजण जखमी झाले असून, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. वर्षानगर परिसरातील चाळीतील एका घरामधल्या सिलेंडर गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्फोटानंतर घरामध्ये आग भडकली होती. दोन दिवसात सिलेंडर स्फोटांमध्ये आठ लोकांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाले आहेत 
विक्रोळी पार्क साईट येथील आग घरामध्ये लागली होती. घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले असले तरी कुर्ला प्रकरण पालिकेवर चांगलेच शेकले आहे. कुर्ला येथील प्रकरणात चायनीज बनवणाऱ्या हॉटेल मध्ये लागलेल्या आगी मध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे अमोर आले आहे. पालिकेच्या लायसन्स, आरोग्य विभाग आणि पोलिसांना हफ्ते देवून मुंबईमध्ये हजारो चायनीज हॉटेल बेकायदेशीर आणि नियम धाब्यावर बसवून चालवली जात आहेत. पालिकेला आणि स्थानिक पोलिसांना मिळणाऱ्या हफ्त्याच्या जोरावर अशी हॉटेल बिनधास्त चालवली जात आहेत. याचे हफ्ते पालिकेच्या लायसन्स, आरोग्य विभाग आणि पोलिसांना दिले जात आहेत. 
कुर्ला प्रकरण दाबले गेले असते किंवा एखादी दुर्घटना म्हणून दुर्लक्ष केले गेले असते. कुर्ल्याच्या प्रकरणानंतर एक दिवस लोटला तरी पालिका बघ्याची भूमिका घेत होती. परंतू या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. कुर्ल्यासारख्या घटना रोखण्यासाठी आढावा घ्यावा आणि या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त अजोय मेहता यान दिले आहेत. अशी माहिती खुद्द्द मुख्यमंत्र्यांनी ट्विटर वर ट्विट करून दिली आहे. कुर्ल्याच्या प्रकरणापर्यंत हफ्ते खाऊन गब्बर बनलेल्या पालिकेला मुख्यमंत्र्यांच्या ट्विटनंतर आपल्या कामाची आणि अधिकाराची जाणीव झाली आहे.   
पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी १७ ऑक्टोबरला एक बैठक घेतली आहे. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, महाराष्ट्र अग्निशमन विभागाचे एम.व्ही.देशमुख, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी आणि उप अग्निशमन अधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त मेहतांनी यांनी भविष्यात या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तपासणी मोहीम अधिक मोठय़ाप्रमाणात व्यापक बनवून विभाग स्तरावर करण्याचा निर्णय घेतला आहे. 
प्रत्येक विभागातील किमान दहा हॉटेलांची तपासणी दररोज करण्यात यावी. ती विभागाच्या सहायक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल. ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व पदनिर्देशित अधिकारी यांचा समावेश असेल. येत्या सोमवारी १९ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.  या तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास हॉटेलांची वीज,पाणी कापून त्यांच्याविरोधात पोलिस कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यावर पालिका आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांप्रमाणे कारवाई होणे गरजेचे आहे. आता पर्यंत पालिकेच्या आरोग्य विभाग आणि लायसन्स विभाग यांनी अश्या हॉटेल मालकांकडून रग्गड पैसा कमावला आहे. याचे हफ्ते काही वरच्या अधिकाऱ्यानाही पोहोचवले जात असतील. यामुळे कारवाई कशी होते याबाबत शंका आहे. तरीही आयुक्त हे कडक शिस्तीचे असल्याने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा मुंबईकर नागरिक करत आहेत. नागरिकांची हि अपेक्षा पालिका आयुक्त कशी पूर्ण करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.    

अजेयकुमार जाधव 
(मो. ९९६९१९१३६३)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages