मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक इंदू मिलच्या जागेत साकारत असून येत्या 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुमिपूजनाचा सोहळा साजरा होणार आहे. राज्यातीलच नव्हे तर देशभरातून जनतेने या ऐतिहासिक सोहळ्यास आणि जाहीर सभेस मोठ्या संखेने उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले. भाजपा प्रदेश कार्यालयात भुमिपुजन कार्यक्रम आणि स्मारकारची रूपरेषा जाहीर करण्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारतीय समाजव्यवस्थेत डॉ. बाबासाहेबांमुळेच दलित, आदिवासी, शोषित आणि महिला यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. अशा महामानवाचे इंदु मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारले जावे, अशी आंबेडकरी जनतेची अनेक वर्षांची मागणी होती. केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आम्ही तातडीने या मागणीची पूर्तत करीत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, जनतेनेही या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्शिदार होण्यासाठी तसेच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे भावनात्मक आवाहन बडोले यांनी केले. तसेच चैत्यभूमिला भेट देऊन मानवंदना देणारे गेल्या चाळीस वर्षातील पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी तातडीने केलेल्या मदतीमुळेच भुमिपुजनाचा योग आल्याचेही बडोले म्हणाले.
डॉ. बाबासाहेबांच्या स्मारक आरखड्याबाबात काही मंडळी जाणीवपूर्वक संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. मात्र जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल, असे आणि बाबासाहेबांच्या महान कार्याला शोभेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तब्बल 150 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा, 140 बाय 110 फुटांचा भव्य स्तूप, त्यावर चोवीस आऱ्या असलेले अशोक चक्र, एकाच वेळी 13 हजार लोक बसू शकतील असा भव्य विपश्यना हॉल,भविष्यातील भारताची वाटचाल दर्शवणारे विशेष दालन तसेच 50 हजार चौरस फूटांचे भव्य ग्रंथालय उभारले जाईल, यातील ग्रंथ संपदेत जगातील कोणतेही पुस्तक उपलब्ध होईल, असे बडोले यांनी सांगितले.
याशिवाय डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाची माहिती देऊ शकेल असे दालन,संविधान कसे घडले याचा ऐतिहासिक घटनाक्रम दाखवणारे संविधान दालन. याशिवाय नाटक,सिनेमा अशा सांस्कृतीक कार्यक्रमासाठी 1500 लोकांची आसनक्शमता असलेले ऑडिटोरियम,विविध दालने, अभ्यंगतांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज पब्लिक प्लाझा, असे विविध उपक्रमयुक्त असलेले तब्बल साडेसात एकरामध्ये डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे, असेही बडोले यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभारले जात आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जनता येणार आहे. अनेक वर्षांपासून राज्यातील जनतेची ती तीव्र इच्छा होती. मात्र या प्रश्नाला टोलवण्याचे काम गेल्या सरकारने केले. परंतु केंद्र आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर एकाच बैठकीत आमच्या सरकारने इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला, त्यामुळेच हे ऐतिहासिक कार्य घडत आहे,असेही कांबळे म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये,आमदार भाई गिरकर, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्श सुभाष पारधी उपस्थित होते.
जाहीर सभेचा कार्यक्रम
दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले चैत्यभुमी येथे येऊन दर्शन आणि धम्म वंदना. त्यानंतर इंदू मिल कंपाऊड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भुमिपूजन. त्यानंतर एम.एम. आर. डी. ए. बांद्रा कुर्ला येथे सायंकाळी 5.30 वाजता जाहीर सभा. जाहीर सभेचे अध्यक्श मा. राज्यपाल, श्री. सी. विद्यासागर राव राहणार असून पंतप्रधान, मुख्यमंत्री, तसेच मा. केंद्रीय संसदिय कामकाज मंत्री, व्यंकैया नायडू, केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग आणि शिपींग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थवर चंद गेहलोत, केंद्रीय राज्यमंत्री संतोष गंगवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील मंत्री,राज्यमंत्री, खासदार, आमदार, मुंबई महापौर यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.
