सनातनसारख्या प्रवृत्तींना वेळीच आळा घालायची गरज - - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 October 2015

सनातनसारख्या प्रवृत्तींना वेळीच आळा घालायची गरज - - प्रकाश आंबेडकर


धमक्‍यांना भीक घालत नाही - प्रकाश आंबेडकर 
मुंबई : सनातनच्या साधकाला गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक झाल्याने सनातनचे खरे स्वरूप समोर आले आहे. सनातनला सरकारने अभय दिले आहे, सनातनसारख्या प्रवृत्तींना वेळीच आळा घालायची गरज आहे; अन्यथा देशासमोर मोठा गंभीर धोका निर्माण होण्याची भीती आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. सरकारने गांभीर्याने वेळीच दखल घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. 
ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपली परखड मते व्यक्त केली. ते म्हणाले, वैदिक परंपरा मानणारे व संत परंपरा मानणारे, असे दोघेही हिंदू आहेत, अशी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची विचारसरणी होती, तर केवळ वैदिक परंपरा मानणारे ते हिंदू अशी सनातनची विचारसरणी आहे, असे त्यांच्या संकेतस्थळावरून लक्षात येते. संत परंपरा मानणाऱ्यांना ते हिंदू मानत नाहीत. सनातनच्या दृष्टीने लव्ह जिहाद, गोवंश हत्या बंदी व धर्मांतर हे हिंदूंचे प्रश्न आहेत. हिंदू समाज सर्वसमावेशक व्हावा, अशी तिघांची भूमिका होती, मात्र सनातनची भूमिका व त्यांच्या भूमिकेमध्ये अंतःर्विरोध असल्याने सनातनच्या लेखी ते विरोधक ठरले. सनातनला जुनी वैदिक पद्धत, जातीयता अमलात आणायची आहे, सर्वणांचे वर्चस्व पुन्हा आणायचे आहे.

सनातन संस्थेच्या विचारसरणीनुसार मृत्यू हा ईश्वराच्या हाती असतो, मग ते कुणालाही मारण्याच्या धमक्‍या कशा काय देऊ शकतात. मी गौतम बुद्धांना मानणारा आहे, बुद्धांनी सांगितले आहे, मृत्यू अटळ आहे. त्यामुळे मी मृत्यूला घाबरत नाही. सनातनच्या धमक्‍यांना भीक घालत नाही. पोलिस व राजकीय क्षेत्रातील एक विशिष्ट वर्ग सनातनच्या पाठीशी आहे, त्यामुळे त्यांच्याकडेच तक्रार करण्यात काही अर्थ नाही. सध्या ज्या पद्धतीने राज्यव्यवस्था चालली आहे, त्यामुळे नागरिकांचा सरकारवरचा विश्वास उडत चालला आहे, पुढील काळात यश मिळण्याची खात्री नसल्याने शक्‍य होईल तेवढ्या बाबी राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षणाला विरोध, राखीव जागांना विरोध, अशा अनेक बाबींमधून हे स्पष्ट होत आहे. सनातन संस्थेचे टार्गेट हे डाव्या चळवळीतील पुरोगामी नेते राहिलेले आहे. सनातन ज्या प्रकारे काम करत आहे, तशा प्रकारचे काम करण्यात नक्षलवादी संघटना अधिक चांगल्या आहेत. प्रशिक्षित लष्करी जवानांशी लढण्याचा त्यांना अनुभव आहे. त्याअनुषंगाने मी वक्तव्य केले होते.

"देशात अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली जेव्हा भाजपचे पहिले सरकार सत्तेत आले, तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्या वेळी बहुमत नसल्याने त्यांना अजेंडा राबवणे कठीण गेले. आता मोदींच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमतामधील सरकार असल्याने हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन प्रभात अशा संघ प्रणीत संघटनांचा आवाज वाढलेला आहे.‘‘ असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या मुलाखतीती म्हटले आहे. 
दैनिक सकाळ मधून साभार 

Post Bottom Ad

JPN NEWS