बेस्ट बसमध्ये वायफाय आणि थांब्यांची आगाऊ माहिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 October 2015

बेस्ट बसमध्ये वायफाय आणि थांब्यांची आगाऊ माहिती

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधील रेल्वे स्थानकामध्ये वायफाय इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच धर्तीवर बेस्टच्या बसमध्येही वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर भामरा यानी केली होती. त्या मागणीचा विचार करत बेस्ट बसमध्ये वायफायची सुविधा बसवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही उपक्रमाने हाती घेतली आहे. बेस्ट प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून वायफायची मोफत सुविधा दिल्यास प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता उपक्रमामधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

गावागावात मोबाईलसेवा पोहचली असली तरी अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा मिळण्यास तांत्रिक अडचणी येत असतात. परिणामी मोबाईलवर इंटरनेटची सुविधा वापर करणा-यांची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून ज्याप्रमाणे रेल्वे स्थानकांवर वायफायची सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे, त्याच धर्तीवर बेस्ट उपक्रमाने सर्व बसगाडयामध्ये वायफायची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीची नोंद बेस्ट प्रशासनाने घेतली असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही परीक्षणाअंती करण्यात येईल, असे उपक्रमाने स्पष्ट केले आहे.

नगरसेवक परमिंदर भामरा यांनी लोकलमध्येप्रमाणे बेस्ट बसमध्येही आगामी बसथांब्यांच्या माहितीच्या उद्घोषणेची सुविधा बस प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपग्रहाच्या माध्यमातून प्रवासमार्गावरील अद्ययावत माहिती प्रवाशांना बसथांब्यावर भ्रमणध्वनीच्या माध्यमातून देण्याची योजना उपक्रमाच्या वतीने सद्य:स्थितीत प्रायोगिक तत्त्वावर काही बसमार्गावर राबवण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले असून या योजनेअंतर्गत बसगाडीमधून प्रवास करणा-या प्रवाशांना पुढील प्रवास मार्ग (बसथांबे) इत्यादींबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेची उभारणी सध्या उपक्रमाच्या बसगाडयावर टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. यंत्रणेची उभारणी पूर्ण झाल्यानंतर उपक्रमाच्या संपूर्ण बस मार्गावर प्रवाशांना पुढील बसथांब्यांबाबतची माहिती उपलब्ध होईल, असे उपक्रमाने स्पष्ट केले आहे. नगरसेवक परमिंदर भामरा यानी ही मागणी महापालिका सभागृहात केली होती. या मागणीचा ठराव सभागृहात करण्यात आल्यानंतर बेस्ट उपक्रमाने आपला अभिप्राय देत अशा प्रकारची यंत्रणा राबवण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS