'बेस्ट' द्वारे क्षयरोग जनजागृती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2015

'बेस्ट' द्वारे क्षयरोग जनजागृती

मुंबई 1 Oct 2015 : मुंबईकरांमध्ये बेस्ट बसेसद्वारे क्षयरोग जनजागृती करण्याचा उप्रकम हाती घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने बेस्टच्या बसेसवर 'टीबी हारेगा, देश जीतेगा' या उपक्रमाचे संदेशदूत अमिताभ बच्चन यांची छबी आणि मोहिमेचे निरनिराळे संदेश असलेले फलक, पोस्टर्स लावण्यात आले आहेत. बेस्टच्या २0 बसेस आणि ४0 थांबे यांच्यामार्फत १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई महानगरपालिका, बेस्ट आणि रोटरी क्लब वर्सोवा यांच्या एकत्रित सहभागाने ही प्रचार मोहीम राबवण्यात येत आहे. 

बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दूधवडकर, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ कुलाबा, बेस्ट भवन येथे गुरुवारी पार पडला. क्षयरोग जनजागृती मोहिमेत अधिकाधिक बसेस आणि बस थांबे यांच्यामार्फत प्रसिद्धी करून मुंबईकरांपर्यंत संदेश पोहोचवला जाईल, असे आश्‍वासन बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दूधवडकर यांनी दिले.

मुंबईमध्ये अलीकडच्या काही वर्षांत हिवताप, स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, क्षयरोग यासारख्या आजारांचा होणारा प्रादुर्भाव पाहता मुंबईकरांनी एकजुटीने लढा देणे आवश्यक आहे. आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि अशी युवकवर्गाची संपत्ती क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजाराला बळी पडू नये, याची जाणीव ठेऊन या कल्याणकारी कार्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील म्हणाले.

दरवर्षी भारतात नवीन १२ लाख, महाराष्ट्रात सव्वालाख तर मुंबईत ३0 हजार क्षयरोगाचे रुग्ण आढळतात. अतिशय दाटीवाटीच्या मुंबई महानगरात संसर्गजन्य क्षयरोग आणि त्यातही औषधांना दाद न देणार्‍या क्षयरोगाचा धोका आहे. हे लक्षात घेऊन महापालिकेने जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी रेल्वेपाठोपाठ बसेस आणि बसथांब्यांवर संदेश झळकावण्यात येत आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.


Post Bottom Ad

JPN NEWS