Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार- पंकजा मुंडे

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 18 Dec 2015
मुलींचे शिक्षण, आरोग्य व उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भ्रुणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. 

पोषण आहार : 1ली ते 5वीसाठी 12 हजार 500 तर 6वी ते 12वी साठी 21 हजार
मुंडे पुढे म्हणाल्या की, ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यभर राबविली जाणार आहे. या योजनेमध्ये ज्या मातेने एकुलत्या एक मुलीवर अंतिम कुटुंब नियोजन केलेले आहे, अशा लाभार्थ्यांना मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी 5 हजार रुपये, मुलगी 5 वर्ष वयाची होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी 5 वर्षांसाठी 10 हजार रुपये, इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत पोषण आहार व इतर संकीर्ण खर्चासाठी 5 वर्षांसाठी एकूण 12 हजार 500 रुपये तसेच मुलीच्या 6 वी ते 12 वी पर्यंतच्या शिक्षणादरम्यान पोषण आहार व इतर खर्चासाठी 7 वर्षांसाठी एकूण 21 हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे.

ज्या मातेला एक मुलगी असून दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे अशा परिस्थितीत जन्मदिन साजरा करण्याकरीता 2 हजार 500 रुपये, दोन्ही मुली 5 वर्ष वयाच्या होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी 5 वर्षांसाठी 10 हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरीता 5 वर्षासाठी 15 हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरीता 7 वर्षासाठी 22 हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. मात्र 1 मुलगी व 1 मुलगा असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

मुलींसाठी विमा योजना : 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार एक लाख रुपये
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींसाठी विमा योजना राबविण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत 21 हजार 200 रुपयाचा विमा एल.आय.सी. मध्ये शासनामार्फत काढण्यात येणार आहे. यासाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपयाचा विम्याची रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या पालकांचाही विमा काढण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या पालकांचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास पुढील प्रमाणे विम्याची रक्कम मिळणार आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 30 हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये, दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास 75 हजार रुपये, एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास 37 हजार 500 रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे.  

गावांचा गौरव : 5 लाख रुपये पारितोषिक
पहिल्या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजन केले असल्यास आजी आजोबांनाही म्हणजे मुलीच्या मातेच्या सासू सासऱ्यांना 5 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे नाणे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तसेच ज्या गावामध्ये मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर 1 हजारपेक्षा जास्त असेल अशा प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीला 5 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे, असेही महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. 
या योजनेकरिता पहिल्या वर्षी रुपये 153.23 कोटी एवढा खर्च अपेक्षित असून 18 वर्षापर्यंत रुपये 3 हजार 111 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. तसेच जे लाभार्थी इतर विभागाच्या योजनेमधून लाभ घेत असतील अशांना या योजनेचा लाभ लागू राहणार नाही. Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom